अकोला : सौर ऊर्जा तंत्रज्ञानांमध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालकांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होईल.

पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. राज्यात सौर ऊर्जाशी निगडीत तंत्रज्ञानांची व सोलर टेक्निशियन तसेच मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकलची गरज लक्षात घेऊन या क्षेत्रातील टेक्निशियन मागणी वाढणार आहे. त्यानुषंगाने दोन नवीन अभ्यासक्रमाची मागणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालकांकडे केली आहे.  राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), ईव्ही मेकॅनिक (इलेक्ट्रिक व्हेईकल) हे नवीन अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत.

कौशल्य विकास विभाग नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या सूचना व सल्ल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सध्या राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत. ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची मागणी करतील, त्यांना मंजुरी देण्यासाठी प्रक्रिया करण्यात येईल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण देऊन अधिकाधिक कुशल मनुष्यबळ तयार करणे हा कौशल्य विकास विभागाचा उद्देश आहे, असे देखील ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३६ जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दर्जावाढ आय.टी.आय हा एक उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी खासगी औद्योगिक आस्थापनांच्या सहाय्याने राज्यातील ३६ जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दर्जावाढ करण्यात येत आहे. औद्योगिक आस्थापनाच्या सहायाने प्रशिक्षण व प्रशिक्षण सुविधा वाढविण्यासह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. आय.टी.आय.मध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे.

तंत्रप्रदर्शन व युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून अधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील नवे अभ्यासक्रम व दर्जावाढ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.