नागपूर : काँग्रेसच्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि इतर काही खासदारांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना संसदेच्या लॉबीत घेरून महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी जाब विचारला. त्यावेळी निशिकांत दुबे यांना जय महाराष्ट्र बोलत तिथून काढता पाय घ्यावा लागला. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खासदार धानोरकर यांचा शनिवारी रविभवन येथे सत्कार केला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांना दोन दिवसांपूर्वी मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. तुम्ही महाराष्ट्राबाबत आक्षेपार्ह विधान का केले, याचा जाब विचारला. तुम्ही कोणाला आपटून आपटून मारणार आहात हे विचारले. काँग्रेस महिला खासदारांचा आक्रमक पवित्रा पाहून निशिकांत दुबे यांनी तिथून जय महाराष्ट्र असे म्हणत काढता पाय घेतला होता.
‘जय महाराष्ट्र’ची घोषणा ऐकून इतर खासदारही तिथे जमले. ही सर्व घटना संसद लॉबीतील कॅन्टीनजवळ घडली. दरम्यान, महाराष्ट्राची बदनामी होते. त्यामुळे महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना जाब विचारला. पक्षभेद विसरून मराठी म्हणून आपण एकत्र येतो, महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो असे सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदारांचे कौतुक केले होते.
महाराष्ट्रात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची करण्यास मनसे आणि शिवसेना तसेच काँग्रेसने विरोध केला होता. याविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले होते. त्यांची एक सभा देखील झाली होती. शिवाय महाराष्ट्रात हिंदी भाषकांना मराठी बोलण्यासाठी मनसे आग्रह होती. काही ठिकाणी परप्रांतियांच्या अरेरावी विरोधात मनसेने आवाज उचलला होता. परप्रांतियांना मारहाण देखील झाली होती. हिंदी भाषक व्यावसायिकांनी मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी गरळ ओकली होती. महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरुद्ध अपशब्द वापरले होते. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
मराठी आणि हिंदी भाषक असा वाद जाणिवपूर्वक भाजपने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपस्थित केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा असून हिंदी भाषक मतदारांची एकगठ्ठा मते मिळवण्याचे प्रयत्न भाजपचे असल्याचा आरोप अजूनही होत आहे.