नागपूर : महाराष्ट्राचा सर्वात युवा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने १६ वर्षांखालील गटाच्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रँड स्विस आंतरराष्ट्रीय क्रमवारी बुद्धिबळ स्पर्धेपूर्वी रौनक भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद यांच्याखालोखाल तिसऱ्या स्थानी होता. मात्र, ११ फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीचा १५ वर्षीय रौनकला फायदा झाला. त्याला दोन स्थानांची बढती मिळाली असून जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार त्याने १६ वर्षांखालील गटात अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

ग्रँड स्विस स्पर्धेपूर्वी एलो २६०९ गुण असणाऱ्या रौनकने त्याच्यापेक्षा पाच वरील मानांकन मिळालेल्या ग्रँडमास्टर खेळाडूंना बरोबरीत रोखले. तसेच त्याने तीन विजयांची नोंद करत एकूण ५.५ गुणांसह स्पर्धेअंती ५७वे स्थान मिळवले. गुकेश आणि प्रज्ञानंदने या स्पर्धेत प्रत्येकी पाच गुण मिळवले होते.