नागपूर : शहरात कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेली आहे. ठोक बाजारात २५० ते ३०० रुपये किलोने कोथिंबीर खरेदी केली जात असून किरकोळ बाजारात कोथिंबीर ४०० रुपये किलोवर गेली आहे. लांबलेल्या पावसाने स्थानिक पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिंबीर जागेवरच खराब झाली. परिणामी, सध्या राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपूरकरांना घ्यावी लागत आहे. एकीकडे पेट्रोल, डिझलचे दर गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे घरगुती सिलेंडर एक हजाराच्या उंबरठय़ावर पोहचले आहे. अशात आता भाजीपाल्यानेही नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. नागपुरात कधी नव्हे इतकी कोथिंबीर महाग झाली आहे. ४० रुपयांची कोथिंबीरची पेंडी शंभर रुपयांवर गेली आहे. नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये २५० ते ३०० रुपये किलोचा दर सुरू आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आणि हातठेल्यांवर कोथिंबीर ४०० रुपये किलोने विकली जात आहे. शेतकऱ्यांच्या मते, लांबलेल्या पावसाने पिकांना चांगलेच झोडपून काढले आणि नाजूक कोथिंबीर जागेवरच खराबी झाली. बहुतांश ठिकाणी ती वाहून गेली. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक घटली. सध्या मध्यप्रदेश, छिंदवाडा, नांदेड येथून कोथिंबीरची आवक नागपुरात होत आहे. मालवाहतुकीचे दर वाढल्याने देखील कोथिंबीरच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्याशिवाय पालक ठोक भावात ६० रुपये तर किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोवर पोहोचल्याची माहिती कॉटन मार्केट येथील ठोक भाजी विक्रेते राम महाजन यांनी दिली. पुढील महिन्यात नवी आवक सुरू होताच कोथिंबीर व इतर भाज्या आवाक्यात येण्याची शक्यता महाजन यांनी वर्तवली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Oct 2021 रोजी प्रकाशित
राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात
पुढील महिन्यात नवी आवक सुरू होताच कोथिंबीर व इतर भाज्या आवाक्यात येण्याची शक्यता महाजन यांनी वर्तवली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-10-2021 at 01:00 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra record most expensive coriander in nagpur zws