नागपूर : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज असतांना महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील कंत्राटी कर्मचारी २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून दोन दिवसांसाठी संपावर गेले आहेत. संपाच्या दुसऱ्या दिवशी सात कायम कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे राज्यात वीज चिंता वाढली आहे.

आंदोलनाला समर्थन देणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांच्या संघटनेत महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन (कृष्णा भोयर, सरचिटणीस ), महाराष्ट्र वीज कामगार महासंघ (बीएमएस)चे अरुण पिवळ ( महामंत्री ), सबॉर्गिनेट इंजिनियर असोसिएशन (म.रा.पि.नं.)चे संतोष खुमकर ( सरचिटणीस ), विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनिवनचे आर. टी. देवकांत ( सरचिटणीस ), महाराष्ट्र राज्य वीज कामगार कांग्रेस ( इंटक )चे दत्तात्रेय गुट्टे ( मुख्य सरचिटणीस), महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनचे प्रेमानंद मौर्य ( सरचिटणीस ), महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे हाजी सय्यद जहिरोद्दीन ( सरचिटणीस ) यांचा समावेश आहे.

हेही वाचा…वर्धा : गावठी दारू फॅक्टरी; ‘किक’ येण्यासाठी युरिया अन…

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यापैकी ७० टक्क्यांहून जास्त कर्मचारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्याचा दावा कृती समितीचा आहे. परंतु वीज कंपन्यांकडून मात्र स्थायी कर्मचाऱ्यांसह सेवेवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आवश्यक सोय केल्याने वीज निर्मिती व पुरवठा सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे ९ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. बुधवारी त्यापैकी ५ हजार कर्मचारी सेवेवर होते. महानिर्मितीने कंत्राटदारांच्या माध्यमातून अतिरिक्त १ हजार कर्मचाऱ्यांची सेवा घेतली. महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे सुमारे २५ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्मे संपावर आहेत. महापारेषणच्या माहिती नुसार, त्यांच्याकडे सुमारे ४ हजार कंत्राटी कर्मचारी असून संपाच्याबाबतीत त्यांचीही स्थिती जवळपास सारखीच आहे. दरमान राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज असतांना दुसरीकडे संपाला समर्थन वाढल्याने राज्यात वीज चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यात काही भागात वीज संनियंत्रणेच्या दुरुस्तीत बुधवारी कंत्राटी कर्मचारी कमी असल्याने विलंब झाल्याचा कृती समितीच्या दावा आहे.

हेही वाचा…चिंता वाढली; अमरावती विभागातील धरणांमध्‍ये ५१ टक्‍के पाणीसाठा

“राज्यातील 48 तास काम बंद आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेतली. प्रश्न सोडवण्याबाबत आदेशही दिले. परंतु एकही प्रश्न सुटला नाही. ऊर्जामंत्र्यांनी या अधिकाऱ्यांवर कारवाई करून आमचे प्रश्न तातडीने सोडवावे.” – नीलेश खरात, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (बी.एम.एस.)