अमरावती : सहा कथित फकिरांनी एका व्यक्तीला गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाख २० हजार रुपयांनी लुबाडले. याबाबत शिरखेड पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोराळा येथील दादाराव नामदेव गणवीर त्यांच्या घरी ३ फकीर आले. तुझ्या घरात गुप्तधन आहे व तुझ्या मुलास जीवाला धोका आहे असे त्यांना सांगितले. गुप्तधन काढण्यासाठी पूजा करण्याचे सांगून सर्वप्रथम ५० हजारांची मागणी केली. गणवीर यांनी गुप्तधनाच्या लालसेने ५० हजार रुपये दिले. पुन्हा पूजा करण्याकरिता एक लाखाची मागणी केली. एक लाख मिळाल्यानंतर चार ते पाच भोंदू फकीर गणवीरच्या घरी आले व रात्रीच्या दरम्यान त्यांच्या शेतात पूजा केली असता खड्ड्यातून एका हंडीतून साईबाबाचे सोन्याचे लॉकेट, तसेच दोन तीन पितळीच्या देवीच्या मूर्ती आणि पाच ते सहा किलो पिवळ्या धातूचे तुकडे असा ऐवज गणवीर यांना काढून दिला व पुन्हा शेतामध्ये दोन गुप्तधनाचे मोठे हंडे असल्याची बतावणी केली. नंतर पुन्हा ९ लाखांची मागणी केली. गुप्तधनाच्या लालसेपोटी गणवीर यांनी शेत विकून ११ लाख २० हजार रुपये त्यांना दिले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गणवीर यांनी आज शिरखेड पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदू फकीर रियाज शहा, नासिर शहा, अल्ताफ शेख अब्दुल शहाव अन्य तीन मांत्रिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.