अमरावती : मराठी भाषा विद्यापीठाची कित्येक वर्षांची प्रतीक्षा आता संपली असून मराठीचे आद्यकर्ते संत आणि समतेचा विचार सर्वप्रथम तेराव्या शतकात मांडणारे गोविंदप्रभू आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील ‘थीम पार्क’मध्ये हे विद्यापीठ सुरू झाले आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी दिली.

मराठी भाषा विद्यापीठात चार प्रशालांच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. या प्रशालांसाठी अभ्यास मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. अभ्यास मंडळांच्या एकत्रित बैठकीनंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लवकरच अभ्यासक्रमांची संरचना तयार केली जाणार आहे. विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून ही सर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठाचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. त्यावर प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात येईल आणि जून-जुलैमध्ये यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश सुरू होतील, असे डॉ. अविनाश आवलगावकर यांनी सांगितले.

मराठी भाषा विद्यापीठात देशातील व परदेशातील साहित्याचे अनुवाद करून त्यांच्या भाषांमधील दर्जेदार साहित्याचा अनुभव घेता येईल. लोककला, लोकसाहित्य, बोलीभाषांचा अभ्यास, प्राचीन ज्ञानाचे संशोधन आदी उपक्रम राबविण्यास आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. ज्या मराठी तरूणांना इंग्रजीतून शिक्षण घेण्याची संधी आर्थिक किंवा इतर अडचणींमुळे मिळू शकली नाही, त्यांना आपल्या मायमराठीतून शिक्षण मिळू शकेल, असे डॉ. आवलगावकर यांनी सांगितले. यावेळी कुलसचिव केशव तुपे, प्रशासकीय अधिकारी राम राठोड उपस्थित होते.

रिद्धपूर हे महानुभाव पंथाचे प्रमुख केंद्र आहे. या भूमीत दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आणि हस्तलिखिते अजूनही संग्रही आहेत. त्यांचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासक येतात. या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ सुरू होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, असे कविश्वर कुळाचार्य महंत मोहनदादा कारंजेकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे आहेत अभ्यासक्रम…

विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसोबतच विविध व्यवसायाभिमूख अभ्यासक्रमही शिकवले जाणार आहेत. मराठी भाषाशास्त्र व लिपीशास्त्र, मराठी भाषा अभियांत्रिकी व संगणकीय भाषाशास्त्र, मराठी समाजभाषा विज्ञान व बोलीविज्ञान, भारतीय व विदेशी भाषा, मराठी अनुवादशास्त्र हे अभ्यासक्रम आहेत. फाईन ॲन्ड परफॉर्मिंग आर्ट, संगीत आणि नृत्य, मराठी अभिजात भाषा, माध्यम लेखन, प्रमाणपत्र मराठी व प्रशासकीय लेखन, लेखन कौशल्य तसेच सामाजिक विज्ञान, पत्रकारिता व जनसंज्ञापन.