निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका; एमआरआय, सिटी स्कॅनसह इतरही तपासण्या ठप्प

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एमएनसी) विधेयकाला विरोध, विद्यावेतन व इतर मागण्यांसाठी मेडिकल, मेयोच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी रुग्णसेवा विस्कळीत झाली. मेडिकल, मेयोतील ३० किरकोळ शस्त्रक्रिया स्थगित कराव्या लागल्या. या संपाचा सर्वाधिक फटका मेयोला बसला. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशने गुरुवारी खासगी डॉक्टरांचा संप स्थगित केल्याचे जाहीर केल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

मेडिकल, मेयो, सुपर, ट्रामा येथील निवासी डॉक्टरांनी बुधवारी सकाळपासून सर्व प्रकारची सेवा बंद केली व अधिष्ठाता कार्यालय परिसरात रॅली काढून शासनाच्या विरोधात निदर्शने केली. दोन्ही रुग्णालय प्रशासनाने मार्डच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून संप न करण्याची विनंती केली. परंतु हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात भजन करून, भिक्षा मागून उपस्थितांचे लक्ष वेधले.

प्रशासनाने तातडीने तेथे वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती केली. एमबीबीएस अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना सहाय्यक म्हणून विविध वार्डात नियुक्त करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागातून पदव्युत्तर शिक्षणासाठी आलेल्या निवासी डॉक्टरांसह वरिष्ठ निवासी डॉक्टर सेवेवर असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. नॉन क्लिनिकल विषयाच्या डॉक्टरांनाही प्रशासनाकडून विविध वार्डासह बाह्य़रुग्ण विभागात नियुक्त करण्यात आले. मेडिकलचे ४१० आणि मेयोतील २०० निवासी डॉक्टर संपावर असल्याने तपासण्याही खोळंबल्या, मेयोतील नेत्र, अस्थिरोग, शल्यक्रिया विभागातील सुमारे २५ किरकोळ शस्त्रक्रिया स्थगित झाल्या, मेडिकलच्या शल्यक्रिया विभागातीलही पाच शस्त्रक्रियाही स्थगित झाल्या. दरम्यान, राज्यातील पूर परिस्थितीमुळे गुरुवारी प्रस्तावित खासगी डॉक्टरांचा संप स्थगित केल्याचे ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी सांगत निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

रुग्णसेवा सुरळीत असल्याचा दावा

मेडिकलमध्ये बुधवारी बाह्य़रुग्ण विभागात २,९२६ रुग्णांवर उपचार झाले. येथे ४७ गंभीर आणि त्याहून अधिक रुग्णांवर किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या. सुपरलाही गॅस्ट्रोइंट्रोलॉजी विभागात २८ एन्डोस्कॉपी, मेंदू शल्यक्रिया विभागात ३, युरोलॉजी विभागात ४ शस्त्रक्रिया झाल्या. हृदयरोग विभागात ३ एन्जिओल्पास्टी,  १४ एन्जिओग्राफी प्रक्रिया झाल्या. रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम झाला नाही, असा दावा मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी केला, तर मेयोत १,८५० बाह्य़रुग्णांवर उपचारासह १० मेजर शस्त्रक्रिया झाल्याचे मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी सांगितले.

निवासी डॉक्टरांकडून रक्तदान

शासनाने तातडीने निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वाढवावे, त्यांना नित्याने विद्यावेतन द्यावे, त्यांची क्षयरोग व प्रसूती रजामंजूर करावी, अशी मागणी मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी डॉ. शुभम इंगळे, मेयोच्या मार्डचे डॉ. प्रथमेश असवले, डॉ. माझ खान, डॉ. अनुपमा हेगडे आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते. पन्नासाहून अधिक निवासी डॉक्टरांनी  येथील गरीब रुग्णांसाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून रक्तदान केले.

‘स्ट्रेचर’ अभावी रुग्णाला फरफटत नेले

मेडिकलमध्ये स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला फरफटत नेण्यात आले. त्यातच निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे एकही डॉक्टर रुग्णाला तपासण्यासाठी आकस्मिक विभागाच्या बाहेर आला नाही.

रतन रामटेके असे रुग्णाचे नाव आहे. त्यांना मानसिक आजार आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. नातेवाईक त्यांना घेऊन मेडिकलच्या आकस्मिक विभागात पोहचले, पण तिथे स्ट्रेचर नव्हते. आकस्मिक विभागातील हा प्रकार अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या निदर्शनात येताच त्यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

सीटी स्कॅनसाठी आलेले रुग्ण परतले

मेयोत सीटी स्कॅन तपासणी बंद आहे. बुधवारी रामदास कोसरे हा रुग्ण कमरेच्या गाठेचे सीटी स्कॅन करण्यासाठी मेडिकलला आला. प्रथम त्याला सुपरला दाखल व्हा आणि तेथेच तपासणी करा, असा सल्ला दिला गेला. त्यानंतर डॉक्टरांचा संप असल्याने येथे तपासणी होणार नसून दोन ते तीन दिवसांनी सीटी स्कॅनसाठी येण्यास सांगण्यात आले