|| महेश बोकडे

खासगी प्रयोगशाळा चालकांचा प्रताप; ट्रामा केअर, स्त्रीरोग विभागातून सर्वाधिक नमुने:-वाद टाळण्यासाठी खासगी प्रयोगशाळा चालकांनी मेडिकलचे वार्ड चक्क आपसात वाटून टाकले असून आपापल्या ‘कार्यक्षेत्रातून’च ते नमुने गोळा करतात. यातही ट्रामा केअर, स्त्रीरोग व प्रसूती विभाग नमुने पाठवण्यात अग्रेसर आहे. मेडिकल चौकातील अनेक खासगी प्रयोगशाळांमध्ये शासनाच्या निकषांना बगल दिली जात असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र निद्रावस्थेत आहे.

मेडिकलसह त्याच्याशी संलग्नित ट्रामा केयर, सुपरस्पेशालिटी रुग्णालयांत रोज सुमारे १,८०० अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होत असतात. ट्रामा केयर सेंटरमधील अपघात तर स्त्रीरोग व प्रसूतीरोग विभागातील अत्यवस्थ रुग्णांची वेळोवेळी रक्त, मलमूत्रासह इतरही तपासण्या कराव्या लागतात. औषधशास्त्र, बालरोग विभागातीलही अत्यवस्थ रुग्णांची तपासणी केली जाते. खासगी प्रयोगशाळांनी आपसातील वाद टाळण्यासाठी येथील जास्त रुग्ण आणि कमी रुग्ण असलेले वार्ड वाटून घेतले आहेत.

जास्त रुग्ण असलेल्या वार्डात जास्त नमुने मिळत असल्याने बऱ्याचदा प्रयोगशाळांमध्ये आपसी वादही होतात. परंतु तातडीने ते दुसऱ्या प्रयोगशाळा मालकाकडून हस्तक्षेप करून निवळले जातात. जेणेकरून इतरांच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये. मेडिकल चौकातील अनेक खासगी प्रयोगशाळा बंद खोलीत चालतात. त्यानंतरही येथे रुग्णांचे नमुने घेऊन ते तिसऱ्याकडे पाठवले जातात.

तपासणी किट्सचा तुटवडा

मेडिकलमध्ये प्रत्येक वर्षी बाह्य़रुग्ण विभागात नऊ लाख तर आंतरुग्ण विभागात ८५ हजार रुग्ण दाखल होतात. डेंग्यू, थायराईडसह इतर तपासण्यांसाठी शासनाने नित्याने आवश्यक किट्ससह रसायन येथे उपलब्ध करायला हवे. ते वारंवार संपत असल्याने तपासण्या रखडतात. त्याचा गैरफायदा येथील डॉक्टर व प्रयोगशाळा चालक घेतात. हे साहित्य येथे उपलब्ध झाल्यास रुग्णांना तपासणीसाठी बाहेर पाठवण्याची गरजच पडणार नाही. परंतु त्यासाठी शासनासह मेडिकल प्रशासनाकडून आवश्यक उपाय करण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘खासगी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांनी रुग्णांचे नमुने घेताना व तपासणी करताना सुरक्षेची काळजी घेतलीच पाहिजे. प्रयोगशाळेत स्वच्छतेसह र्निजतुकीकरण आवश्यक आहे. महापालिकेच्या मंजुरीसह इतरही नियम पाळणे आवश्यक आहे. मेडिकल चौकातील खासगी प्रयोगशाळेत नियम मोडल्याची तक्रार नसली तरी विषयाचे गांभीर्य बघत तातडीने प्रयोगशाळांची तपासणी केली जाईल. त्यात काही अनुचित आढळल्यास नियमानुसार कारवाई करू. ’’– डॉ. सरिता कामदार, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.