प्रादेशिक मनोरुग्णालयातील धक्कादायक प्रकार; नातेवाईकांचे पत्ते नसल्याने रुग्णालय प्रशासन हतबल, महिलांच्याही संख्येत वाढ
पोलिसांसह विविध सामाजिक संस्थांनी वेडय़ासारख्या वागणाऱ्या व्यक्तींना रेल्वेस्थानक, बसस्थानक व इतर भागातून नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचाराकरिता आणले. पैकी शंभरावर रुग्ण बरे झाले आहेत, परंतु या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता सांगता येत नाही. रुग्णालय प्रशासनाकडेही नातेवाईकांची नोंद नाही. त्यामुळे प्रकृती ठीक झाल्यावरही या रुग्णांना मनोरुग्णांप्रमाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातच जगावे लागत आहे.
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची रुग्ण क्षमता ९४० इतकी आहे. या संस्थेत पुरुष मनोरुग्णांसाठी ६६० खाटा असून ९ वार्डस् आहेत तर महिला मनोरुग्णांसाठी २८० खाटा असून ९ वार्डस् आहेत. येथील मनोरुग्णालयात सध्या साडेपाचशेवर रुग्ण उपचार घेत आहेत. अलीकडे महिलांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी महिलांचा आकडा २९६ पर्यंत पोहोचला होता. येथे मनोरुग्णांवर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात. अनेक वर्षांच्या उपचारातून या शासकीय रुग्णालयात शंभरहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, परंतु उपचारादरम्यान मनोरुग्णांच्या आयुष्यातील सगळे रंग हरवलेले असतात.
जेव्हा ते बरे होतात तेव्हा त्यांच्यावर संस्कार करण्याची गरज असते. ते संस्कार व्यवसायोपचार विभागाच्या माध्यमातून केले जातात. ते कार्य अतिशय सहजपणे मनोरुग्णालयात डे-केअरच्या माध्यमातून होत आहे. सोबतच सामाजिक पुनर्वसनाचे उपक्रम राबविले जातात. त्यात बरे झालेल्या मनोरुग्णांचे मनही रमते, परंतु त्यांच्यातील व्यावसायिक क्षमतांची ओळख करून देण्याची गरज बरे झालेल्या मनोरुग्णांना आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून हे मनोरुग्ण येथे उपचार घेत आहेत. मात्र, मनोरुग्णालय प्रशासनाकडे अनेक मनोरुग्णांच्या घरांचे पत्ते नाहीत. त्यांना कधी नातेवाईक भेटायला येत नाहीत. यामुळे असे सव्वाशेवर बरे झालेले रुग्ण नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातच निवासी झाले आहेत.
मनोरुग्णालय हेच त्यांचे घर झाले आहे. कर्मचारी हेच त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या बऱ्या-वाईट दिवसातील सोबत्याची, नातेवाईकांची भूमिका येथील डॉक्टर, कर्मचारी निभावतात, हे विशेष. मात्र, शहाणे झालेल्या मनोरुग्णांना सोडायचे कुठे, हा प्रश्न मनोरुग्णालय प्रशासनासमोर गेल्या तीन दशकांपासून कायम आहे. या मनोरुग्णांच्या नातेवाईकांना शोधण्याकरिता प्रशासनाला मदत करणार कोण? हा प्रश्न मनोरुग्णालयातील अधिकारी विचारत आहे.
या कामाकरिता विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु त्याकडे त्यांचेही लक्ष नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुनर्वसनासाठी प्रयत्नांची गरज -डॉ. नगरकर
ताणतणावासह अनेक वेगवेगळ्या कारणांनी मानसिक विकार होतात, परंतु योग्य उपचाराने मनोविकार बरा होतो. हे रुग्ण बरे झाल्यानंतर इतरांप्रमाणेच सामान्य जीवन जगण्याची संधी मिळणे, हा त्यांचा हक्क आहे, परंतु समाज स्वीकारण्यासाठी पुढे येत नाही. कित्येक वर्षांपासून रुग्ण येथे आहेत. त्यांचे पत्ते नाहीत. त्यांच्या पुनर्वसनासाठी मनोरुग्णालयात प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक महिन्यात २ ते ३ रुग्णांना घरी पाठवण्यात प्रशासनाला यशही मिळते, असे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित नगरकर यांनी सांगितले.