लेखी परीक्षेत ‘ब’ प्रश्नपत्रिकेवर विद्यार्थ्यांचा आक्षेप; पोलीस आयुक्तांचे चौकशीचे आदेश
नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे ग्रामीण पोलीस आणि मध्यवर्ती कारागृहासाठी घेण्यासाठी घेण्यात आलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र, नागपूर शहर पोलीस आयुक्तातर्फे घेण्यात येत असलेल्या पोलीस भरतीला लागलेले ग्रहण सुटायचे नाव नाही. या भरती प्रक्रियेत प्रत्येक पावलावर घोळ असून मर्जीतील उमेदवारांना लाभ पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांकडून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप उमेदवार करीत आहेत.
गेल्या ३ फेब्रुवारी २०१६ पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. १८ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले. त्यानंतर ३० मार्चपासून काटोल मार्गावरील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १६ एप्रिलपर्यंत पुरुष आणि महिला उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर ताबडतोब उमेदवारांचे गुण त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येकाला त्यांना मिळालेले गुण माहीत होते. उद्या, १९ एप्रिलला उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती आहे. यासाठी आज पात्र उमेदवारांची (कट ऑफ लिस्ट) यादी मुख्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यावर अनेकांचा हिरमोड झाला. पात्र उमेदवार आणि त्यांच्या नावासमोरील गुण बघून अनेकांना धक्का बसला. ज्यांची नावे यादीतून वगळण्यात आली त्यांना त्याच प्रवर्गात अधिक गुण मिळालेले आहेत. त्यामुळे बघता बघता पीडित उमेदवारांनी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारणे सुरू केले. ओबीसी प्रवर्गातील एका महिला उमेदवारास शारीरिक चाचणीत ९२ गुण मिळालेले असतानाही तिचे नाव यादीत नव्हते, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेवटच्या उमेदवाराला ५० गुण असताना त्याला यादीत स्थान मिळाले, तर त्याच्यापेक्षा अधिक गुण असलेल्यांची नावे यादीतच नव्हती. त्यामुळे १९ एप्रिलला होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तेव्हापासून या भरती प्रक्रियेला लागलेले ग्रहण सुटण्याची अद्याप चिन्हे नाहीत. त्यानंतर २१ एप्रिल आणि १० मे रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
शेवटी मंगळवारी १७ मे रोजी सकाळी ७ वाजता काटोल मार्गावरील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही परीक्षा पार पडली. मात्र, पेपर सुटल्यानंतर नवीन घोळ उभा ठाकला. ही परीक्षा सकाळी ७ ते ८.३० वाजेदरम्यान घेण्यात आली. परीक्षा शंभर गुणांची असून त्यासाठी ३ हजार ९६ उमेदवार प्रविष्ठ झाले होते. उमेदवारांना एकमेकांशी संवाद साधून कॉपी करता येऊ नये म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर ए, बी, सी आणि डी अशा चार प्रकारात प्रश्नपत्रिकांचे संच तयार करण्यात आले. पेपर सुटल्यानंतर उमेदवार उत्तरपत्रिकेची कॉर्बन कॉपी घेऊन बाहेर पडले. प्रश्नपत्रिकेवरून त्यांनी उत्तरपत्रिकेतील आपण सोडविलेल्या प्रश्नांची उत्तरे तपासत असताना प्रश्नपत्रिकेच्या ‘ब’ संचात प्रश्नांच्या खाली दिलेल्या चार पर्यायापैकी उत्तराचे पर्याय पुसट स्वरूपात आढळले. प्रत्येक प्रश्नांचे उत्तर पुसट असल्याने उमेदवारांना संशय आला. त्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांकडे तक्रार करून ही बाब लक्षात आणून दिली. परंतु पोलीस अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याने उमेदवारांनी गोंधळ घातला.

पोलीस व उमेदवारांमध्ये धक्काबुक्की
परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना प्रश्नपत्रिकेच्या ‘ब’ संचातील उत्तराचे पर्याय पुसट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. यावेळी उमेदवारांनी अधिकाऱ्यांनी चर्चा करण्याची मागणी केली. परंतु बंदोबस्तातील अधिकाऱ्यांनी त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि उमेदवारांमध्ये धक्काबुक्की होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर उमेदवारांनी मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयाकडे वळविला.

भ्रष्टाचाराचा आरोप
उमेदवारांना या पोलीस भरतीमध्ये मोठय़ा प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे. मर्जीतील उमेदवारांना मेरिटमध्ये आणण्यासाठी हा खटाटोप सुरू असून जाणीवपूर्वक गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव लेखी परीक्षेच्या पात्रता यादीत देण्यात आले नव्हते. उमेदवारांनी आवाज उठविल्यानंतर त्यांचे नाव समाविष्ठ करण्यात आले. ते झाल्यानंतर आता लेखी परीक्षेत मर्जीतील उमेदवारांना अधिकचे गुण मिळावे म्हणून एक संच वेगळया पद्धतीने फोडण्यात आला, असे आरोप उमेदवारांनी पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी प्रश्नपत्रिकांचे संच तपासले. यात ‘ब’ संचातील चार पर्यायातील उत्तराचे पर्याय पुसट असल्याचे दिसते. यात चूक झालेली मान्य असून प्रकरणाचा चौकशी करण्यात येईल. नंतर संबंधितांवर कारवाई करू आणि आवश्यक वाटल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल.शारदाप्रसाद यादव, पोलीस आयुक्त