स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन तब्बल महिनाभर उशिराने

चार हजार किलोमीटरचा प्रवास करून पट्टकादम हंस उपराजधानीत

चार हजार किलोमीटरचा प्रवास करून पट्टकादम हंस उपराजधानीत

नागपूर : पक्ष्यांचे स्थलांतरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही निसर्गातील बदलाचा त्यांच्या स्थलांतरणावर परिणाम होतो. उपराजधानीत ऑक्टोबरच्या उत्तरार्धात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन यावर्षी तब्बल महिनाभर उशिरा झाले आहे. आठ हजार मीटर उंचीवरून सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास करून पट्टकादम हंस (बार हेडेड गुज) उपराजधानीत दाखल झाले आहेत.

जगण्यासाठी आवश्यक असलेले चांगले पर्यावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिलांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधण्याकरिता दूर अंतरावरून स्थलांतर करत पक्षी येतात. वर्षांच्या एका विशिष्ट कालावधीत त्यांचे स्थलांतरण होते. काही पक्षी अन्न आणि प्रजननासाठी वर्षांच्या वेगवेगळ्या हंगामात स्थलांतर करतात. पट्टकादम हंस हा त्यापैकीच एक आहे. उन्हाळ्यात हे पक्षी मंगोलिया ते तिबेटच्या पठारापर्यंत कुठेही आढळतात. हिमालय पार करण्यापूर्वी तिबेट, कझाकस्तान, रशिया, मंगोलियाकडून ते दक्षिणेकडे स्थलांतर करतात. नागपुरात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ापासून तर मार्चच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत या स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम असतो. यावेळी मात्र, ते महिनाभर उशिराने दाखल झाले असले तरी जाण्याचा कालावधी तोच राहण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल, वादळ, अवकाळी पाऊस आणि उशिरा सुरू होणारा हिवाळा या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत.

रविवारी उमरेड मार्गावरील हळदगावजवळच्या दुधा तलावाजवळ सुमारे ४१ पट्टकादम हंस पक्ष्यांचा थवा व्यंकटेश मुदलीयार, हरीश धुमाळ, यश मिश्रीकोटकर या पक्षी अभ्यासकांना दिसून आला. उशिरा का होईना स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन शहरात झाले आहे. मात्र, पक्षी छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या चढाओढीत त्यांच्या स्थलांतरणाला धक्का पोहचवू नये, अशी अपेक्षा पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

 

इतरही पक्ष्यांची सोबत

पट्टकादम हंस, चक्रवाक, तलवार बदक, शेंडी बदक, छोटी लालसरी, मोठी लालसरी, अडई, भुवई बदक, मलिन बदक, थापटय़ा बदक आदी स्थलांतरित पक्षी दहा ते बाराच्या संख्येत आलेले आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांचे ठिकाण असलेले मटकाझरी, सायकी, वडगाव हे तलाव पाण्यानी तुडुंब भरलेले आहे. त्यामुळे आवश्यक अधिवास आणि खाद्य यावर्षी नाही. परिणामी, ज्या तलावांवर, किनारे तसेच आवश्यक अधिवास व खाद्याची उपलब्धता आहे, त्याचठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांनी मुक्काम केला आहे.

– अविनाश लोंढे, पक्षी अभ्यासक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Migratory birds arrival delayed for almost a month zws

ताज्या बातम्या