जीवे मारण्याची धमकी देऊन एका १३ वर्षीय विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये समोर आली. त्यानंतर मुलाच्या घरी चोरी करून दागिने व पैसेही उकळण्यात आले. याप्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोघेजण फरार आहेत.
पीडित विद्यार्थी, त्याचा मित्र व दोन अल्पवयीन मुले एकाच शाळेत सातव्या वर्गात शिकतात. ते व फरार झालेले दोघे भाऊ मित्र आहेत. फरार असलेले दोघे भाऊ ऑगस्ट २०१८ पासून पीडित मुलगा व त्याच्या मित्राला ठार मारण्याची धमकी देत होते. दोघांना घरून पैसे आणायला लावत होते. घरात चोरी करून दोन्ही मुलांनी आतापर्यंत चौघांना ८० हजार रुपये व दागिने दिले. रविवारी दोघांनी पीडित मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर पैशाची मागणी केली. पीडित मुलाचा मित्र घाबरला. रविवारी तो घरी चोरी करीत असताना त्याला नातेवाईकांनी पकडले. त्याला विचारणा केली असता त्याने संपूर्ण घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर यशोधरानगर पोलिसांनी आरोपी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले.