एका अकरा वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. आशीष जोसेफ अॅन्थोनी (३४), या आरोपीस पोलिसांनी अटक केली.
पीडित मुलगी आणि आरोपी मार्टिननगरातील रहिवासी असून एकमेकांचे शेजारी राहतात. पीडित मुलगी ही सदर परिसरातील एका शाळेत शिकत असून शाळेच्या वसतिगृहातच राहते. काही दिवसाकरिता ती घरी आली होती. १७ सप्टेंबरला पीडित मुलीचे आई वडील घराबाहेर गेले होते. त्यावेळी ती घरात एकटीच होती. रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपी हा तिच्या घरी आला आणि तिच्यावर बलात्कार केला. तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी शांत होती. रात्री १२ वाजताच्या सुमारास तिचे आई वडील घरी परतले. मात्र, तिने जिवाच्या भीतीपोटी काहीच सांगितले नाही. त्यानंतर २४ सप्टेंबरला तिचे आई वडील तिला वसतिगृहात सोडण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी पीडित मुलीने ओटीपोटात दुखत असल्याचे सांगितले. तिच्या आई वडिलांनी रुग्णालयात घेऊन गेले असता तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली, अशी माहिती जरीपटक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चक्षुपाल बहादुरे यांनी दिली.