निवृत्त लष्करप्रमुख मलिक यांचे मत

नागपूर : कारगिल युद्धानंतर युद्ध आढावा समिती आणि सशस्त्र दलाच्या अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या. पण, आपण आज देखील त्या सर्व गोष्टींचे निराकरण करू शकलेलो नाही, असे मत निवृत्त लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी व्यक्त केले.

प्रहार समाज जागृती संस्था, नागपूरच्यावतीने सोमवारी २२ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.

मलिक म्हणाले, कारगिल दिवस साजरा करण्यामागचा उद्देश त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करणे हा आहे. ते का घडले, कसे घडले,  ते घडू नये म्हणून आपण काय केले, त्यापासून आपण काय धडा घेतला, अशी चर्चा यानिमित्ताने होते. हे विश्लेषण वर्षांनुवर्षे चालू राहणार आहे. पण मला आजही असे वाटते की, कारगिल युद्ध आढावा  समिती आणि सशस्त्र दलाने ज्या गोष्टी नमूद केल्या  त्या सर्व गोष्टीचे पालन होऊ शकलेले नाही. अर्थात काही गोष्टींचे पालन झालेही आहे.

कारगिल युद्धातील विजय हा सशस्त्र दलांसोबतच भारतीयांचा विजय आहे. या युद्धादरम्यान भारतीय नागरिकांनी, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्षाने कधी नव्हे एवढी एकजुटता दाखवली. संपूर्ण देश एकजूट होता. राष्ट्र एकत्र काम करत असल्याचे अशाप्रकारे कधीही पाहिले नव्हते. दुर्दैवाने आज  लहान-लहान कारणांसाठी देशातील लोक भांडत असतात. पण, कारगिल युद्धासारखी परिस्थिती आल्यास संपूर्ण देश एकत्र येईल आणि तेथे राजकीय दुफळी नसेल, असा आशावादही मलिक यांनी व्यक्त केला.

कारगिल हुतात्म्यांना राज्यसभेत श्रद्धांजली

नवी दिल्ली : पाकिस्तानबरोबरच्या कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना राज्यसभेत सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी यावेळी शत्रूचा पराभव करणाऱ्या जवानांच्या अतुलनीय शौर्याची प्रशंसा केली. राज्यसभेच्या सदस्यांनी ऑलिंपिकमध्ये रजत पदक मिळवणाऱ्या मीराबाई चानू हिचे अभिनंदन केले.

राष्ट्रपतींचा द्रास दौरा रद्द, बारामुल्ला युद्धस्मारकास भेट

श्रीनगर : कारगिल विजय दिनानिमित्त सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा द्रास येथे आयोजित करण्यात आला होता. लडाख येथे हे ठिकाण असून तेथे ते हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणार होते. पण प्रतिकूल हवामानामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी त्यांनी बारामुल्ला येथील युद्धस्मारकात जाऊन तेथे श्रद्धांजली अर्पण केली. तीन वर्षांत दुसऱ्यांदा कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित दौरा रद्द करण्यात आला असून यंदा कारगिल विजयला २२ वर्षे झाली आहेत.