यवतमाळ : आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या आमदारांवर पैसे घेतल्याचा आरोप केला, तो माझ्या एकट्यावर नसून, सत्ताधारी पक्षातील सर्वच आमदारांवर आहे. आम्ही पैसे घेतले तर ते दिले कोणी, या प्रश्नाचे उत्तरही आ. राणा यांनी दिले पाहिजे. मी पैसे घेतल्याचे पुरावे येत्या १ नोव्हेंबरपर्यंत राणांनी सादर केले नाही तर, आमच्या पद्धतीने आंदोलन करू. वेळप्रसंगी आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.

हेही वाचा >>>भंडारा : प्रेमाच्या त्रिकोणातून प्रियकराच्या डोळ्यावर पट्टी बांधून प्रेयसीने केले कोयत्याने वार ; प्रियकराने कसाबसा वाचवला जीव

आ. कडू हे आज, शनिवारी यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब आणि राळेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतात भेट देण्यासाठी आले असता बाभूळगाव येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. बाभूळगाव तालुक्यातील सरूळ, तांबा आदी गावात त्यांनी शेताच्या बांधावर भेट दिली. तसेच बाभूळगाव येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी बोलताना आ. कडू यांनी खा. सुप्रिया सुळे यांनी राजकीय नेत्यांसाठी सुचविलेल्या आचारसंहितेच्या कल्पनेचे स्वागत केले. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन राजकीय व्यक्तींनी कसे बोलायचे, काय बोलायचे या संदर्भात आचारसंहिता ठरविणे अत्यंत गरजेचे आहे. अशा आरोप–प्रत्यारोपांमुळे वेळ, श्रम विनाकारण वाया जातात, असे कडू म्हणाले. मंत्रीपदासाठी कडूंची सर्व धडपड सुरू असल्याबाबत विचारले असता, असे मंत्रीपद आवोळून टाकतो, असे ते म्हणाले. वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन पूर्ण ताकदीने मैदानात उतरू, तेव्हाचा बच्चू कडू काही वेगळा असेल, असेही त्यांनी सांगितले. आ. राणांनी केलेल्या आरोपांचा निषेध म्हणून आम्ही १ नोव्हेंबरला आंदोलनास बसणार आहोत. ज्या ताकदीने त्यांनी आरोप केले, आता त्यांच्यात दम असेल तर पुरावे सादर करावे, असे आव्हान कडू यांनी दिले. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तत्काळ पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘एनी डेक्स अ‍ॅप’ डाऊनलोड करायला लावून अडीच लाखांनी फसवणूक; पोलिसांनी काही तासांत लावला छडा

मंत्रीपदाच्या रांगेत कशाला लागता?
आम्ही ५० खोके घेतल्याचा आरोप करणारे आ. रवी राणा स्वत: मंत्रीपदाच्या रांगेत कशासाठी लागतात, असा प्रश्न यावेळी आ. बच्चू कडू यांनी उपस्थित केला. आ. राणा यांनी थोडी तरी लाज, लज्जा ठेवायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्या घरी जेवायला जायचे त्याच घरवाल्यांना ताट फेकून मारण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही, असा सल्लाही त्यांनी राणांना दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रीपद न मिळाल्याने बच्चू कडू शेताच्या बांधावर
अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या भरीव मदतीची गरज असताना सरकारने तोकडी मदत जाहीर केली. यादरम्यान आमदार बच्चू कडू यांना शेतकरी आठवले नाही. आता मात्र मंत्रीपद मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने ते शेतीच्या बांधावर पोहोचल्याची टीका शेतकरी वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शहा यांनी केली आहे.