मान्सूनच्या अंदाजावरून चाललेला गोंधळ आता संपला असला तरीही मान्सूनचा म्हणावा असा पाऊस पडलेलाच नाही. मान्सूनचा पाऊस म्हणजे, दिवसभर कोसळणारा, पण सध्यातरी नागपूरसह विदर्भातील काही भागात दिवसा उघडीप आणि रात्री पाऊस, असे चित्र सुरू असल्यामुळे शेतकरीसुद्धा विवंचनेत होता. मात्र, येत्या ३० जूनपर्यंत वदर्भात मान्सून स्थिरावेल, असा अंदाज हवामान खाते आणि अभ्यासकांनी दिला आहे.
नागपूरसह विदर्भातील काही शहरांमध्ये गेल्या आठवडय़ापासून रात्री तास-दोन तास मुसळधार पाऊस आणि दिवसा मात्र पाऊस गायब, अशी स्थिती आहे. या पावसाने वातावरणात बऱ्यापैकी गारवा निर्माण झाला असला तरीही जलाशयातील पाण्याची पातळी वाढलेली नाही. मान्सून स्थिरावल्यानंतर तलाव, नद्या, नाले, धरणांमधील पाण्याची पातळी उंचावते. आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाने विदर्भातील जलाशयात फारसा फरक पडलेला नाही. येत्या ३० जूनपर्यंत विदर्भातील काही भागात हलक्या, तर काही भागात मध्यम सरी कोसळण्याचे संकेत हवामान खाते आणि अभ्यासकांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पेरण्यांची तयारीही सुरू झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने सुरुवातीला दिलेल्या अंदाजावर विसंबून आणि राज्यात पूर्व विदर्भातून मान्सूनचा प्रवेश, अशा बातम्यांमुळे नागपूर, वर्धा, अमरावतीसह अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात केली. त्यातच हवामान खात्याने यंदा भरपूर पाऊस कोसळणार, असे जाहीर केल्याने खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना बळ मिळाले. हवामान खात्याने मान्सून जाहीर करण्याची केलेली घाई शेतकऱ्यांच्या अंगलट आली आणि काही शेतकऱ्यांना पहिली, तर काहींना दुसरी पेरणीही गमवावी लागली. आता मात्र सलग आठवडाभरापासून रात्री का होईना पाऊस बरसत आहे. पावसाच्या या रूपामुळे शेतकरी विवंचनेत अडकला असला तरीही एकूणच मान्सून स्थिरावण्यासाठी लागणारी परिस्थिती या आठवडय़ाभरात निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा नव्याने तो पेरणीसाठी सज्ज झाला आहे. वातावरणातील उकाडा असह्य करणारा असल्याने शहरी नागरिकसुद्धा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अध्र्याहून अधिक जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेल्यानंतर जूनच्या अखेरीस पावसाने हलक्या स्वरूपात का होईना दाद दिली आहे. मात्र, जोपर्यंत जलाशयातील पाण्याची पातळी वाढत नाही, तोपर्यंत पावसाचे येणे हे क्षणिकच आहे. यावेळी तरी हवामानखात्याचा अंदाज खरा ठरावा, अशी अपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्यांकडूनही केली जात आहे.