नागपूर : देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल ६ नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आला. त्या देशातील २८ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ पैकी ३११ नद्यांची काही क्षेत्र प्रदूषित आढळली. यात महाराष्ट्रातील ५५ नद्यांचा समावेश आहे.
नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रम’ राबवण्यात येतो. यात पाण्यातील रसायने, सूक्ष्मजीव यांचा विचार केला जातो. विशेषत: पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावरून त्याचे प्रदूषण ठरवले जाते. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ देशभरातील नद्यांमधील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासते. यापूर्वी २०१८मध्ये देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. त्यात ३५१ नद्यांचे काही पट्टे प्रदूषित जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता हा अहवाल प्रकाशित झाला आहे. यात देशातील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्यांची काही क्षेत्रे प्रदूषित आढळली आहेत.
हेही वाचा >>>विभागीय कार्यालयाला टाळे लागताच एसटी महामंडळ ताळ्यावर! कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदानासाठी…
महाराष्ट्रातील ५५, मध्यप्रदेशातील १९, बिहारमधील १८, केरळमधील १८ आणि कर्नाटकातील १७ नद्यांचा समावेश प्रदूषित नद्यांमध्ये आहे. २०१९ आणि २०२१ यादरम्यान महाराष्ट्रातील ५५ नद्यांचे १४७ ठिकाणी घेतलेले नमुने प्राणवायू मानकांच्या तपासणीत प्रदूषित आढळले. महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भिमा या सर्वाधिक प्रदूषित, तर त्याखालोखाल गोदावरी, पावना, कन्हान आणि मुठा-मुळा या नद्या प्रदूषित आढळल्या.
उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याची गांभीर्याने तपासणी करत नाही. उद्योगातील घातक रसायने आणि सांडपाणीही नदीप्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. -प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक