उपराजधानीतील स्थिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारने नोटाबंदी लागू केल्यानंतर शहरातील दुचाकी वाहनांच्या विक्रीला फटका बसला आहे. या वाहनांची नोंदणी १८ ते २० टक्क्यांनी घटली असून चारचाकी वाहनांच्या नोंदीत मात्र, १२ टक्के वाढ झाल्याने हा पैसा काळा की पांढरा? अशी चर्चा परिवहन विभागातील अधिकाऱ्यांमध्येच आहे.

केंद्र सरकारने रोखरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्याकरिता नोटाबंदीचा निर्णय घेतला. या नोटा काही दिवस शासकीय विभागात स्वीकारल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याकरिता मुदत देण्यात आली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वत्र चलनाचा तुटवडा निर्माण होऊन अनेक व्यवसाय ठप्प झाले. नोटाबंदीनंतर केंद्र सरकार व रिझव्‍‌र्ह बँकेने अनेक नवीन निर्णय घेतले, पैकी काही निर्णय मागे घेण्याले तर काहींमध्ये बदलही करण्यात आले. या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप झाला.

शहर आणि पूर्व नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांत १ एप्रिल २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत नवीन दुचाकी वाहनांच्या नोंदीत तब्बल १८ ते २० टक्के घट झाली. या कालावधीत चारचाकी वाहनांच्या विक्रीला त्याहून जास्त फटका बसण्याची शक्यता परिवहन विभागातील अधिकारी व्यक्त करत होते. मात्र, उलट चारचाकी वाहनांच्या विक्रीत तब्बल १२ टक्के वाढ नोंदवल्या गेली. तेव्हा परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. चारचाकी वाहनांची खरेदी प्रामुख्याने श्रीमंत गटातील नागरिकांकडून तर दुचाकी वाहनांची खरेदी गरीब, मध्यमवर्गीय व श्रीमंत या तिन्ही गटातील व्यक्तींकडून होते. त्यात गरीब व मध्यमवर्गीयांची संख्या जास्त असते. तेव्हा या नोटबंदीचा श्रीमंताच्या तुलनेत गरिबांना जास्त फटका बसला काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्यावसायिक गटातील ऑटोरिक्षा, स्कूलबस, ई-रिक्षासह जड वाहनांची विक्री या कालावधीत वाढली आहे, हे विशेष.

वर्धा जिल्ह्य़ात दुचाकी व चारचाकीची विक्री जोरात

नागपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या आखत्यारित येणाऱ्या वर्धा जिल्ह्य़ात एप्रिल ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत नोटाबंदीनंतरही दुचाकी व चारचाकी वाहनांच्या नोंदीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. येथे दुचाकीची नोंदणी या कालावधीत ७० टक्के तर चारचाकी वाहनांची नोंदणी २६ टकक्यांनी वाढल्याची माहिती आहे.

लवकरच स्थिती सुधारेल -भुयार

शहर आणि पूर्व नागपूर परिवहन अधिकारी कार्यालयात दुचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली असून चारचाकी वाहनाच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसत आहे. लवकरच विविध कारणांनी दुचाकी वाहनांची विक्री सुधारण्याची आशा आहे. वाहन नोंदणीकरिता नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आरटीओ प्रशासन विविध सुधारणा करीत आहे.

– रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर

 

 

शहरातील वाहन नोंदणीचा तक्ता

१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१६

वाहनाची वर्गवारी       २०१४- १५    २०१५- १६    २०१६- १७

………………………………………

नागपूर शहर

दुचाकी वाहन                  ८७९०         ८३६६            ७०८९

चारचाकी वाहन              २४७०         २९००            ३२२२

इतर संवर्ग                       १२८०         ८७६             १४०८

………………………………………

पूर्व नागपूर

दुचाकी वाहन                   २०८३३       १९६५६       १५४२६

चारचाकी वाहन                   २६६१        ३०२४        ३४४०

इतर संवर्ग                            ३०२०        १६४५        ३३५९

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorcycle sales decline but car increased in nagpur
First published on: 11-01-2017 at 04:46 IST