नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे राज्यभर शिक्षक कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी पेन्शन योजना लागू करावी, या व अन्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक आमदार नागो गाणार, विभाग कार्यवाह योगेश बन, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी यांनी केले.

यावेळी नोव्हेंबर २०१० चा शासन निर्णय रद्द घोषित करून सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, घोषित अघोषित शाळांना व त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांना तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकडय़ांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान देणे, वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण शुल्क रुपये २००० रुपये रद्द करणे, भविष्य निर्वाह निधी खात्याची बीडीएस प्रणाली पुर्ववत सुरू करणे आदी मागण्या करण्यात आल्या. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा शिक्षक परिषदेचे विभाग कार्यवाह योगेश बन यांनी दिला. या धरणे आंदोलनात विभाग कोषाध्यक्ष नरेश कामडे, शहर अध्यक्ष सुभाष गोतमारे, कार्यवाह सुधीर वारकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनीषा कोलारकर, जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष सुनील पाटील, प्रमोद बोढे आदी उपस्थित होते.