तांत्रिक गोंधळामुळे अर्ज भरणे कठीण
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे जणू समस्यांचे केंद्रच झाले आहे. भरतीप्रक्रियेत वारंवार होणाऱ्या दिरंगाईनंतर आता संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळेही उमेदवारांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. आयोगालाही अर्जाच्या तारखांमध्ये वारंवार बदल करावा लागत असल्याने अखेर अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची नामुष्की ‘एमपीएससी’वर ओढवली आहे. ‘एमपीएससी’च्या संयुक्त गट-क परीक्षेसाठी सध्या अर्ज भरणे सुरू आहे. यासाठी आयोगाने सुरुवातीला ११ जानेवारी ही मुदत दिली होती. त्यात पुन्हा १५ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली. मात्र, त्यानंतरही ‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर तांत्रिक गोंधळ असल्याने विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर सातत्याने सुरू असलेल्या गोंधळामुळे अर्ज भरला जाईल की नाही, असा संभ्रम असल्याने याविरोधात आयोगाकडे तक्रारीही करण्यात आल्या. त्यामुळे अखेर आयोगाने अर्ज भरण्याची प्रक्रियाच स्थगित करत तांत्रिक गोंधळ दूर झाल्यानंतर अर्ज भरणे सुरू केले जाईल, असे जाहीर केले. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यात दिलासा मिळाला असला तरी ‘एमपीएससी’ कडून सातत्याने होत असलेल्या अशा गोंधळामुळे विद्यार्थ्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.
खासगी कंपनीमुळे गोंधळ
आयोगाच्या संकेतस्थळाचे कंत्राट हे एका खासगी कंपनीला दिले आहे. ही कंपनी आपले काम त्रयस्त संस्थेकडून करत आहे. मात्र, नव्याने आलेल्या या कंपनीला संकेतस्थळ सांभाळण्यास अडचणी येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास उमेदवारांना सातत्याने अडचणी येत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाच्या सचिवांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
वेळेत अर्ज भरला जात नसल्याने विद्यार्थ्यांनी आयोगाशी संपर्क साधला. परंतु कुणी प्रतिसाद देत नाही. शिवाय उपमुख्यमंत्र्यांनी आयोग विद्यार्थ्यांच्या सेवेत २४ बाय ७ राहील, असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले, हे अद्याप कळायला मार्ग नाही.
– उमेश कोर्राम, अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.