देवेश गोंडाणे

नागपूर : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या अभ्यासक्रमात बदल झाल्यानंतरही प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन निविदा प्रक्रिया न राबविता ६ ऑक्टोबरला पत्र काढत विद्यार्थ्यांना ‘एमपीएससी’ प्रशिक्षणासाठी ज्ञानदीप अकादमी पुणे येथे प्रशिक्षणासाठी कागदपत्रांची तपासणी व छायांकित प्रत जमा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र चार दिवसांतच म्हणजे १० ऑक्टोबरला कुठल्याही आधाराविना नवीन पत्र काढून ज्ञानदीप अकादमीमध्ये कागदपत्र जमा करण्यास स्थगिती देण्याचा हास्यास्पद प्रकार केला. ‘महाज्योती’च्या अशा ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप होत असून प्रशिक्षण संस्थेसोबत टक्केवारीच्या वाटाघाटी फसल्याने ही स्थगिती देण्यात आल्याची चर्चा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमध्ये आहे.

‘महाज्योती’च्या वतीने ‘एमपीएससी’ पूर्वपरीक्षा प्रशिक्षण देण्यात येत असून यासाठी दीड हजार विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड करण्यात आली. दोन वर्षांपासून करोना असल्याने मागील वर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी ज्ञानदीप अकादमी पुणे यांची निवड करण्यात आली होती. यंदा विद्यार्थ्यांना ऑफलाइन माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र, त्यांना कुठल्या संस्थेतून प्रशिक्षण दिले जाईल हे आतापर्यंत निश्चित नव्हते. ‘महाज्योती’ने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वप्रशिक्षणासाठी तीन संस्थांची निवड केली. ‘एमपीएससी’ने नुकताच ‘यूपीएससी’च्या धर्तीवर त्यांच्या अभ्यासक्रमात बदल केला.  त्यामुळे ‘यूपीएससी’प्रमाणेच ‘एमपीएससी’ साठीही विद्यार्थ्यांना किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा पर्याय दिला जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु महाज्योतीने ६ ऑक्टोबरला पत्र काढून ज्ञानदीप अकादमी येथे निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी व छायांकित प्रत जमा कराव्यात, अशा सूचना दिल्या. राज्याच्या विविध भागांतील काही विद्यार्थ्यांनी कागदपत्रेही जमा केली. मात्र, अचानक १० ऑक्टोबरला नवीन पत्र काढून कागदपत्रे जमा करण्यास स्थगिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांकडून विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. स्थगितीला कुठलाही आधार नसल्याने संबंधित प्रशिक्षण संस्थेसोबत टक्केवारीच्या वाटाघाटींची यशस्वी बोलणी न झाल्याची चर्चा आहे.

विद्यार्थी काय म्हणतात? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एमपीएससी’च्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला असून २७ वैकल्पिक विषय आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळय़ा वैकल्पिक विषयाची निवड करतो. एकाच शिकवणीमध्ये या सर्व विषयांचे प्रशिक्षण मिळणेही कठीण आहे. हाच मुद्दा ‘यूपीएससी’च्या विद्यार्थ्यांचाही असल्याने ‘महाज्योती’ने त्यांना तीन प्रशिक्षण वर्गाचा पर्याय दिला. असे असताना ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना एकाच प्रशिक्षण केंद्राच्या दावणीला का बांधले जात आहे? असा प्रश्न उपस्थित करीत किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा पर्याय द्यावा अशी मागणी आहे.

‘एमपीएससी’च्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय व्हायला नको, त्यांना दर्जेदार आणि बदलेल्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण मिळावे यासाठी ही स्थगिती दिली आहे. लवकरच नवीन पत्र निघणार असून विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाईल.

– प्रदीपकुमार डांगे, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती