scorecardresearch

विदर्भ संघात निवडीचे आमिष दाखवून मुंबईच्या कबड्डीपटूची १.७०‎ लाखांनी फसवणूक

विदर्भाच्‍या संघात निवडीचे आमिष दाखवून दोघा आरोपींनी मुंबईच्या एका कबड्डीपटूची १.७०‎ लाखांनी फसवणूक केल्याची घटना‎ उघडकीस आली आहे.

fraud 22
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अमरावती : विदर्भाच्‍या संघात निवडीचे आमिष दाखवून दोघा आरोपींनी मुंबईच्या एका कबड्डीपटूची १.७०‎ लाखांनी फसवणूक केल्याची घटना‎ उघडकीस आली आहे. याप्रकरणी‎ शहर‎ कोतवाली पोलीस ठाण्यात‎ फसवणुकीचा‎ गुन्हा दाखल करण्यात आला.‎ जितेंद्रसिंग प्राणसिंग ठाकूर व‎ भूपेद्रसिंग प्राणसिंग ठाकूर (दोघेही‎ रा.पन्नालाल बगीचा) अशी गुन्हा‎ दाखल झालेल्यांची नावे आहेत.‎ तसेच स्वागत आनंदा शिंदे (२५, रा.‎ मुंबई) असे तक्रारकर्त्या खेळाडूचे‎ नाव आहे.

स्वागत शिंदे हा जानेवारी‎ २०२१ मध्ये मुंबईतच कबड्डीचा‎ सराव करीत होता. त्यावेळी त्याच्या‎ प्रशिक्षकाने जितेंद्र उर्फ जितू ठाकूर‎ याची विदर्भ कबड्डी असोसिएशनचे‎ सचिव या नात्याने ओळख करून‎ दिली. त्यावेळी जितू ठाकूरने‎ स्वागत शिंदे याच्या खेळाचे कौतुक‎ करून त्याला विदर्भस्तरीय कबड्डी‎ चमूमध्ये निवड करण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आपण १ लाख ७०‎ हजार रुपये दिल्याचा उल्लेख ‎ स्वागतने तक्रारीत केला आहे.

हेही वाचा >>>> “राहुल गांधींना चीनबद्दल सहानुभूती पण…”, अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “म्हणूनच काँग्रेस…”

आरोपींनी स्‍वागत शिंदे याचा विश्‍वास संपादन केला. तुझे कबड्डी खेळण्‍याचे कौशल्‍य चांगले आहे. तू विदर्भाचा नसूनही तुझी विदर्भ कबड्डी संघात निवड करून देतो. त्‍यासाठी मात्र २ लाख रुपये द्यावे लागतील, तुला राष्‍ट्रीय स्‍पर्धेतही खेळण्‍याची संधी मिळेल, असे आरोपींनी सांगितले. त्‍यानंतर स्‍वागतने आपले वडील दोन लाख रुपये देण्‍यास तयार नाहीत, ते दीड लाख रुपये देऊ शकतात, असे आरोपींना सांगितले. आरोपीने बँकेच्‍या खात्‍यावर दीड लाख रुपये पाठविण्‍यास सांगितले.

हेही वाचा >>>> कर्मचारी संपावर आज तोडगा निघणार? निमंत्रक समितीला चर्चेचे निमंत्रण, पण…

१७ मार्च २०२१ रोजी स्‍वागतच्‍या वडिलांनी ही रक्‍कम आरोपीच्‍या बँक खात्‍यात वळती केली. पण, काही दिवसांनी राष्‍ट्रीय स्‍पर्धेसाठी निवड समिती दीड लाख रुपयांमध्‍ये निवड करण्‍यास तयार नाही, आणखी पैसे हवेत, असे आरोपींनी सांगितल्‍यावर स्‍वागतच्‍या वडिलांनी पुन्‍हा २० हजार रुपये पाठवले. त्‍यानंतर काही दिवसांनी आरोपींनी स्‍वागतला अयोध्‍या येथे आयोजित राष्‍ट्रीय कबड्डी स्‍पर्धेत खेळण्‍यासाठी पाठवले. तेथे त्‍याला आपल्‍या नावाची नोंदणीच झाली नसल्‍याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यावर स्‍वागतने आरोपींकडे पैसे परत मागितले. पण, ते देण्‍यास त्‍यांनी टाळाटाळ केली. अखेरीस स्‍वागत याने तक्रार दाखल केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 14:36 IST

संबंधित बातम्या