जयताळा परिसरातील घटना

दोन हजार रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला. ही धक्कादायक घटना एमआयडीसी पोलीस हद्दीत  गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. रोशन राजेश नगराळे (१९) रा. गायत्री मंदिरजवळ, लोखंडेनगर असे मृताचे तर अजिंक्य राजेश तेलगोटे (१९) रा. रमाईनगर, जयताळा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ते दोघेही बेरोजगार होते.  रोशनने अजिंक्यला अनेकदा पाचशे, हजार रुपये उसणे दिले होते. आरोपीकडे मृताचे जवळपास दोन हजार रुपये उधार होते. त्या पैशाची मागणी रोशन करायचा. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाला. काही दिवसांपूर्वी रोशनने अजिंक्यला शिवीगाळ करून मारहाण केली होती. याचा राग अजिंक्यच्या मनात होता. गेल्या ९ सप्टेंबरला रात्री ११ वाजताच्या सुमारास अजिंक्यने रोशनला जयताळा परिसरातील माऊली मंदिरजवळ बोलावून घेतले. चर्चेदरम्यान पुन्हा पैशाचा वाद सुरू झाला. तेथून ते दोघेही राज्य राखीव पोलीस मुख्यालयाच्या मागील भिंतीला लागून असलेल्या झुडुपाजवळ थांबले.  एका झुडपातून अजिंक्यने लोखंडी रॉड काढून रोशनच्या डोक्यात मारला. त्यानंतर विटाने चेहरा ठेचून काढला. नंतर अजिंक्यने रोशनचा मृतदेह एका खड्डय़ात लपवून ठेवला व त्यावर माती टाकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोशन घराबाहेर जात असताना आपण अजिंक्यला भेटायला चाललोय, अशी माहिती दिली होती. दोन दिवस उलटल्यानंतरही मुलगा घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अजिंक्यकडे विचारणा केली. त्यावेळी अजिंक्य उडवाउडवीचे उत्तर देत होता. रोशनचे मित्रही अजिंक्यवर दबाव आणू लागले. तेव्हा अजिंक्यने आपण त्याचा खून केला असून मृतदेह लपवला असल्याची कबुली बुधवारी रात्री दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपीस अटक केली.