लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या घाईत महामेट्रोने खापरी ते बर्डी मार्गावर तेथील कामे अपूर्ण असतानाही सेवा सुरू केली तीच घाई आता विधानसभा निवडणुकीपूर्वी बर्डी ते हिंगणा (लोकमान्यनगर) मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी केली जात आहे. या मार्गावरील ११ पैकी तीनच स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत.

निवडणुकीपूर्वी विविध लोकप्रिय घोषणा करण्याची घाई सत्ताधारी पक्षाने करणे स्वाभाविक आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रणेला निवडणूक घाईने झपाटणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत मेट्रोसेवा सुरू करायचीच, असा संकल्प करून महामेट्रोने आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्च महिन्यात खापरी ते बर्डी मार्गावर सेवा सुरू केली. तेव्हा या मार्गावरील फक्त चारच स्थानकांची कामे पूर्ण झाली होती. अजूनही उर्वरित स्थानकांचे काम झाले नाही. घाईघाईत सुरू झालेली सेवा नंतर काही दिवस बंद ठेवण्यात आली व नंतर पुन्हा सुरू झाली. आताही सर्व स्थानके सुरू न झाल्याने पुरेशा प्रमाणात मेट्रोला प्रवाशी मिळत नाही. हीच घाई आता विधानसभेच्या निमित्ताने बर्डी ते हिंगणा (लोकमान्यनगर)  मार्गाबाबत सुरू आहे. निवडणुकांची घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यापूर्वी या सेवेचे उद्घाटन करण्याचे प्रयत्न महामेट्रोचे आहेत. त्यासाठी दिवसरात्र काम सुरू आहे. मात्र अजूनही या मार्गावरील १० पैकी फक्त लोकमान्यनगर, सुभाषनगर आणि इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्स या स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या सेवेचा प्रवाशांना कितपत फायदा होईल याबाबत साशंकताच आहे. निवडणुकीपूर्वी सेवा सुरू  करण्याचे श्रेय सत्ताधारी घेतील, दुसरा टप्पा सुरू झाल्याचा आनंद महामेट्रोला होईल, पण ज्यांच्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली, त्या नागपूरकरांना याचा खरच लाभ होतो का, हा खरा प्रश्न आहे.

‘‘बर्डी-लोकमान्यनगर मेट्रो सेवेमुळे हिंगण्याकडे जाणाऱ्या व तेथून येणाऱ्यांची सोय होणार आहे. मेट्रोसेवा सुरू झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्याच्या अंतराने उर्वरित स्थानकांची कामे पूर्ण केली जातील.’’

– महामेट्रो.