नागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’ला पुन्हा आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये ४५ प्रवासी होते. आगीचा भडका उडण्याआधीच सर्व प्रवासी बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोन आठवडय़ापूर्वी गिट्टीखदान परिसरात धावत्या आपली बसने पेट घेतला होता. या घटनेची आज पुनरावृत्ती झाली. यामुळे आपली बसचे संचालन करणाऱ्या डिम्स कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आपली बस क्रमांक एमएच ३१ एससी ०४१३ गुरुवारी सकाळी उमरेड मार्गावरील तितूरवरून बर्डीकडे येत होती. दरम्यान, मेडिकल चौकातील संगम हॉटेलसमोर बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक दिवाकर काकडे यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळ न दवडता बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर पडण्यास सांगितले. यानंतर बसने पेट घेतला. सक्करदरा आणि गणेशपेठ केंद्रातील दोन अग्निशमन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच आगीचे खरे कारण समोर येईल, असे अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले.

योग्य तपासणी नाही !

महापालिकेच्या परिवहन विभागाने ‘स्क्रॅप’मध्ये काढलेल्या २४० बसेसपैकी ६० बसेस पुन्हा दुरुस्त करण्यात आल्या असून त्या शहरातील विविध भागात धावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डेपोमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी करण्याची जबाबदारी डिम्स कंपनीकडे आहे. मात्र, गेल्या काही दिवसात तपासणी न करता बसेस बाहेर काढल्या जात असल्यामुळे आगीच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.

बस संचालन करणाऱ्या तीन खासगी कंपन्यांवर तपासणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, ही तपासणी योग्यरित्या होते की नाही, याबाबत चौकशी केली जाईल. जुन्या बसेसची वायिरग खराब झाल्यामुळे असे प्रकार घडतात. – रवींद्र पागे, प्रशासकीय अधिकारी, परिवहन विभाग, महापालिका