राजकीय दबावाखाली महापालिकेचा कोंडवाडा विभाग मूग गिळून
नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या मोकाट डुकरांवरील पकडण्याच्या मोहिमेनंतर महापालिका राज्यभरात चर्चेत आली असून शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. ही मोकाट जनावरे अचानक आडवी आल्याने अनेक अपघात होत असताना महापालिका प्रशासन आणि पशू व दुग्ध विकास विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याचे दिसून येते. यामुळे आता राजकीय दबावामुळे महापालिकेचा कोंडवाडा विभाग मोकाट जनावरांवर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्ते वाहतुकीसाठी मोकळे असावेत, असा नियम आहे. शहरातील निम्म्या रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे, तर काही रस्त्यांवर विकासकामे सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी, रस्त्यांवरून वाहने धावण्याऐवजी रांगताना दिसतात. यात आता मोकाट जनावरांची समस्या भेडसावत आहे. शहरातील दुग्ध उत्पादन करणारे व पशुपालक सर्रास आपली जनावरे रस्त्यांवर सोडून देतात. चाऱ्याच्या शोधात जनावरे दिवसभर फिरत असतात. काही जनावरे रस्त्यांवर बसून वाहतूक व्यवस्थेत खोडा घालतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अचानक जनावर वाहनासमोर आल्याने अपघात होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. यासंदर्भात उच्च न्यायालयाने पशू व दुग्ध विकास विभाग व महापालिकेला आदेशही दिले. पण, त्यांच्याकडून विशेष अशी कारवाई होताना दिसत नाही. मोकाट जनावरांची समस्या कायम आहे. महापालिका, दुग्ध विकास विभाग व पोलीस हे एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून स्वत:ची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतात. खरे तर काही राजकीय पुढारी रस्त्यांवर जनावरे सोडणाऱ्या लोकांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे महापालिका व दुग्ध विकास विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसून येते. मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी आता उच्च न्यायालयानेच प्रशासनाला कठोर आदेश देण्याची आवश्यकता आहे.
५८९ अनधिकृत गोठेधारक
दुग्ध व्यवसाय करण्याच्या उद्देशाने गोठा टाकण्यासाठी जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडून पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरात ४५७ गोठेधारकांनी अशी परवानगी घेतली असून त्यांच्याकडे ३ हजार १९ जनावरे आहेत. त्यापैकी १४१ गोठेधारकांच्या १ हजार २४२ जनावरांना बिल्ले लावण्यात आले आहेत. उर्वरित जनावरांना अद्याप बिल्ले लावण्यात आले नाहीत, तर ५८९ अनधिकृत गोठेधारक असून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालय, विभागीय आयुक्तांनी यापूर्वी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाला आदेशही दिले होते. पण, महापालिकेने ते आदेश वेशीवर टांगून ठेवले आहे.
मोकाट डुकरे पकडण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम संपल्यानंतर रस्त्यांवरील मोकाट जनावरांविरुद्धही मोठय़ा प्रमाणात मोहीम राबवण्यात येणार आहे.भविष्यात शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे दिसू नयेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
– डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.