जे नागरिक नियमितपणे मालमत्ता कर भरतात त्यांच्यासाठी महापालिकेने अपघात विमा संरक्षण योजना सुरू केली खरी परंतू, गेल्या वर्षांपासून ही योजना केवळ कागदावरच असून नागरिकांना तिचा लाभ मिळालेला नाही. मालमत्ता कर दिलेल्या मुदतीत भरण्यास नागरिकांना प्रवृत्त करणे या उदात्त हेतूने ही योजना सुरू करण्यात आला होती. मालमता कराची थकबाकी भरली जात असल्याने महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत वाढता दिसत असला तरी या योजनेला पदाधिकाऱ्यांसह मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.
दरम्यान, संबंधित विमा कंपनीत महापालिकेने हप्त्याची रक्कम न भरल्यामुळे त्यांनी ही योजना बंद केली असल्याची माहिती समोर आली आहे. स्थाानिक स्वराज्य कर रद्द झाल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच नाजूक झाली आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा उत्पन्नाचा मोठा स्रोत असताना तो जास्तीत जास्त नागरिकांनी भरण्यासाठी चालना मिळावी यासाठी अपघात विमा संरक्षण योजना सुरू करण्यात आली.
त्यासाठी संबंधित विमा कंपनीकडे महापालिकेतर्फे दरवर्षी हप्ता भरला जात होता, मात्र अनेक वर्षे या योजनेची जनतेला माहितीच नव्हती. साहजिकच योजनेचा फायदा घेणाऱ्यांची संख्याही नगण्य होती. त्यावर उतारा म्हणून महापालिकेने तीन वर्षांपूर्वी या योजनेसंदर्भात घरोघरी पत्रके वाटण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या पत्रकावर या योजनेसंबंधीच्या संपूर्ण माहितीअभावी आणि प्रशासनानेही गांभीर्य न दाखवल्यामुळे सदर योजना फसली. त्यावेळी अवघ्या पाच ते सहा लोकांना या योजनेचा लाभ मिळाला होता. मात्र गेल्या वर्षभरात ही योजनाच बारगळल्याचे समोर आले आहे.
या योजनेनुसार पात्र मालमत्ता धारकाचा अपघात किंवा अन्य दुर्घटनेत मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जात होते. जे मालक स्वत:च्या मालकीच्या जागेत राहतात, तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद, वैयक्तिक भाडेकरू, कर भरणारे मालमत्ताधारक, त्याची पत्नी आणि मुले या योजनेसाठी पात्र होते. नैसर्गिक मृत्यू, सर्पदंश, खून, विजेचा धक्का, जनावरांचा हल्ला किंवा चावा इत्यादी कारणांमुळे मृत्यू झाला तरी या योजनेचा लाभ दिला जाण्याची त्यात तरतूद होती. अपघातात अपंगत्व आल्यास आर्थिक मदत दिली जाणार होती, मात्र गेल्या वर्षभरात या योजनेचा कुणालाही लाभ तर झालेलाच नाही शिवाय अनेकांना या योजनेची माहितीही नाही.

करदात्यांना लाभ
या संदर्भात महापालिकेच्या कर समितीचे सभापती गिरीश देशमुख म्हणाले, मालमत्ता कर भरणाऱ्यांना अपघात विमा ही योजना माहीत असून त्याचा लाभ नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या अनेक ग्राहकांना झाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचा चार ते पाच लोकांना लाभ झाला होता मात्र त्यानंतर विमा कार्यालयात महापालिकेकडून संबंधित रक्कम भरण्यात आली नसावी. या संदर्भात माहिती घेतली जाईल आणि ही योजना बंद झाली असेल तर ती पुन्हा सुरू करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.