उपराजधानीतील रंगकर्मीचा प्रश्न
शहरात डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या नावाने नाटय़गृह आहे, सावनेरमध्ये राम गणेश गडकरी स्मारक व नाटय़गृह आहे. कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या नावाने सभागृहाची निर्मिती केली जात आहे, मग महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आणि नागपूर हीच कर्मभूमी असलेल्या ज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तरांचा विसर का पडावा, असा प्रश्न उपराजधानीतील रंगकर्मीनी उपस्थित केला आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ज्येष्ठ नेपथ्यकार आणि दिग्दर्शक गणेश नायडू यांनी दारव्हेकर मास्तरांच्या स्मृतिनिमित्त या शहरात काहीच होत नाही अशी खंत व्यक्त केली. त्यांच्या भावनांना नाटय़क्षेत्रातील कलावंतांनी पाठिंबा दिला. समाज माध्यमावर यावर चर्चा झाली. राम गणेश गडकरी आणि वसंतराव देशपांडे या दोघांच्या कर्तत्वाविषयी मला निंतात आदर असून त्यांच्या नावाने असलेल्या नाटय़गृहाला विरोध नाही. मात्र, वसंतराव देशपांडे हे विदर्भाचे नाहीत. शंकरराव सप्रे यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी ते आले होते, एवढाच त्यांचा नागपूरशी संबंध आहे. राम गणेश गडकरी केवळ २८ दिवसांसाठी उपचाराकरिता सावनेरमध्ये आले होते. तिथेच त्यांचे निधन झाले. तरीही ते विदर्भाचे होतात. त्यांच्या स्मृतीनिमित्त नाटय़गृहे बांधली जातात, मग १९६७ पासून पुढे ३० वर्षे मुंबईत स्थानिक होऊन त्या ठिकाणी नाटय़ सेवा करीत राहिलेले दारव्हेकर मास्तर मुंबईचे झाले का व मुंबईकरांनी त्यांच्या स्मृतीनिमित्त मुंबईत काही केले का, असा प्रश्न नायडू यांनी उपस्थित केला. मास्तरांनी अनेक वर्ष वैदर्भीय रंगभूमीची सेवा केली आणि विदर्भाचा गौरव वाढवला. त्यांच्या बाबतीत आपण इतके मूकबधिर का झालो आहे. प्राचार्य शेवाळकरांच्या घरासमोरील काळ्या फरशीवर नाव लिहून स्मृती कायम राहावी म्हणून दारव्हेकर मास्तरांच्या कार्य कर्तृत्वाला मान दिल्याचा आव आणू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, महापौर प्रवीण दटके यांना निवेदन देणार असल्याचे नायडू म्हणाले.
या संदर्भात ज्येष्ठ नाटय़ दिगदर्शक मदन गडकरी म्हणाले, रंगभूमीच्या क्षेत्रात मास्तरांचे काम मोठे आहे. नागपूर सोडून ते मुंबईला स्थायिक झाले. त्यांची कर्मभूमी ही नागपूरच आहे. अनेक कलावंत त्यांनी घडविले. त्यामुळे त्यांच्या नावाने स्मृती कायम राहावी यासाठी संघटितदृष्टय़ा प्रयत्न केले पाहिजे. नागपुरात तशीही नाटय़गृहांची कमतरता आहे त्यामुळे मास्तरांच्या नावाने एखादे सभागृह झाले तर कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होईल आणि त्यांची स्मृती कायम राहील.
अजित दिवाडकर म्हणाले, मास्तरांचा सहवास लाभल्यानंतर त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केल. विशेषत: १९५४-५५ मध्ये आकाशवाणी बालविहारमध्ये होत असलेल्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. मास्तरांच्या उत्तरार्धाचा काळ मुंबईला गेला. त्यांची खरी जडणघडण ही नागपुरात झाली. आमच्यासारखे अनेक कलावंत त्यांनी घडविले. त्यामुळे त्यांची स्मृती कायम राहावी या उद्देशाने नाटय़गृह बांधले तर ते चांगले होईल. शासनाने त्या दृष्टीने विचार केला पाहिजे.
ज्येष्ठ नाटय़ कलावंत प्रभाकर आंबोणे म्हणाले, कवी सुरेश भट केवळ नागपूरचेच नव्हे तर साऱ्या जगाचे भूषण होते. त्यांच्या नावाने सभागृहाची निर्मिती होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मास्तरांची स्मृती कायम राहावी या दृष्टीने आणखी एका नाटय़गृहाची निर्मिती केली पाहिजे. रंजन कला मंदिर ही संस्था त्यांनी स्थापन केली. अनेक कलावंत त्या संस्थेच्या माध्यमातून घडले. त्यांच्यामुळे नागपूरची ओळख आहे. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजे. ज्येष्ठ नाटय़ कलावंत मधू जोशी यांनी मास्तरांच्या आठवणी सांगत त्यांच्या स्मृतीनिमित्त कलावंतांसाठी एखादी वास्तू उभी राहावी किंवा एखादा मोठा उपक्रम राबविला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मास्तरांची प्रतिमा गेली कुठे?
लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहाच्या प्रवेशद्वारावर लावलेली दारव्हेकर मास्तरांची प्रतिमा गेल्या काही दिवसांपासून काढून टाकण्यात आली आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला होता, तेव्हा लोकसत्ताने ही बाब उघडकीस आणल्यानंतर त्यांची प्रतिमा लावण्यात आली होती, ती आता सभागृहात दिसत नसल्याने कुठे गेली, असा प्रश्न रंगकर्मीनी उपस्थित केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur poeple forgotten senior dramatist master purushottam darvekar
First published on: 23-04-2016 at 02:40 IST