नागपूर: ‘सुरक्षित रस्त्यावर सुरक्षित महिला’ मिशन घेऊन नागपुरातील ४३ वर्षीय पियुषा सबाने हिने रविवारी नागपुरातील दीक्षाभूमी ते सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम असे ७५ किलोमिटरचे अंतर धावून पूर्ण केले. साडेदहा तासात समतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमानिमित्त आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने प्रभा शहाणे यांनी पियुषाचे सूतमाळेने स्वागत केले.
पीयुषा सबाने या दुबई येथे नोकरी करीत असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत यापूर्वीसहभाग नोंदविला आहे. लेह लडाख येथील पाच तासात ४२ किमी. चा त्यांचा प्रवास अचंबित करणारा आहे.
महिलांना घराबाहेर पडताना विचार करावा लागतो. परंतु पियूषाने रविवारी दीक्षाभूमी ते सेवाग्राम असा ७५ किमीच्या धावेतून ‘सुरक्षित रस्त्यावर सुरक्षित महिला’चा संदेश सामान्यांना दिला आहे. समाजातील महिलांच्या ज्वलंत प्रश्नावर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा त्यांचा हा छोटासा प्रयत्न आहे. रोडही आपल्याकडे असुरक्षितच आहेत. महिलांना घराबाहेर पडताना विचार करावा लागतो, तसा पुरुषांना नाही. महिलांना संपूर्ण सुरक्षितता मिळाली पाहिजे. महिला शक्तीशाली तर राष्ट्र शक्तीशाली, देशात महिलांना सुरक्षित वाटायला पाहिजे. त्यासाठी मी रोडवर धावले, असे पियुषा सबाने म्हणाल्या.
नागपुरातील दीक्षाभूमी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षेचे, तर गांधीजींचा आश्रम हे स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने याची निवड केल्याचे पीयूषा यांनी सांगितले. या दोन्ही ठिकाणांचे वेगळे महत्त्व असल्याचे पियुषा यांनी सांगितले. निश्चित स्थळ गाठल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री विजय तांबे आणि ज्येष्ठ साहित्यिक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय इंगळे तिगावकर यांच्या हस्ते पियुषाचा सत्कार केला गेला.
यावेळी त्यांच्यासोबत पुण्याहून आलेल्या अनिता यांनी सुद्धा सायकलिंग केले. त्यानिमित्त अनितासोबतच पियुषाचे कोच मारुती गायकवाड यांचे स्वागत बहार नेचर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे यांनी केले. यावेळी सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या डॉ. पल्लवी वांदीले, जनमंचचे संस्थापक सदस्य पदम ठाकरे, प्रा. रेखा ठाकरे, धामणगाव येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रवीश बिरे, यांच्यासह स्वतः आकांक्षा प्रकाशनच्या संचालक आणि साहित्यिक अरुणा सबाने, सतीश मोरे, जयंत सबाने आदींसह त्यांचे अनेक नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.
दीक्षाभूमी ते सेवाग्राम मार्गावर…
दीक्षाभूमीवरून निघाल्या पासून तर सेवाग्रामला पोहोचेपर्यंत बुटीबोरी, खडकी, केलझर, पवनार, सेलू अशा अनेक ठिकाणी पियुषाचे अनेकांनी स्वागत करून तिचे बळ वाढवले. त्यांच्या या मिशनमध्ये त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी सतत माझ्या सोबत राहून भरपूर प्रोत्साहन दिले, असे पियुषा सबाने यांनी सांगितले.
