गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी मत चोरीमुळेच विराजमान झाले. तेव्हापासून भाजप सत्तेत येण्यासाठी हाच प्रयोग करत आहे. हे सत्य बाहेर आणण्यास काँग्रेसने उशीर केला असा तरी यामुळे संसदीय व्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. असा आरोप नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे. प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) पक्षाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
काँग्रेस पक्षाने देशभरात मोहीम सुरु करून सत्ताधारी भाजपवर मत चोरीचे आरोप केले आहे. भाजपने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे मत चोरी केली, याचे कथित पुरावे राहुल गांधी यांनी सादर केले आहे. काँग्रेसच्या या आरोपाचे नक्षलवाद्यांनीही समर्थन केले असून भाजप मतचोरीचा प्रयोग गुजरात विधानसभेपासून करत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) पक्षाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त नक्षल्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात चळवळीचा संक्षिप्त लेखाजोखा मांडण्यात आला आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद संपविण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेमुळे मागील वर्षभरात आजपर्यंतचे सर्वाधिक नुकसान झाल्याचेही मान्य करण्यात आले आहे.
सोबतच सत्ता पक्षाचे विकसित भारत म्हणजे हिंदूराष्ट्र असा दावाही पत्रकात केला आहे. जर सरकार नक्षल प्रभावित भागातील मोहीम थांबवून शांतीवार्ता करण्यास तयार असेल तर आम्ही देखील अनुकूल आहोत. असे आवाहनही नक्षल्यानी केले आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच नक्षल चळवळीचे सूत्र देवजीकडे तर दंडकारण्याची जबाबदारी माडवी हिडमा याच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनतर दोन दिवसांनी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने केंद्रीय समिती सदस्य मनोज उर्फ बालन्ना ठार केले होते.
वर्षभरात ३६६ नक्षल ठार
नक्षल चळवळीचे संस्थापक चारू मुजुमदारच्या मृत्यूनंतर गेल्या पन्नास वर्षात संघटनेला सर्वाधिक नुकसान गेल्या वर्षभरात सोसावे लागले. यादरम्यान मोठ्या नेत्यांसह ३६६ नक्षलवादी विविध चकमकीत ठार झाले. नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता सीपीआय (माओवादी) महासचिव बसवराज, केंद्रीय समिती सदस्य चलपती, विवेक, उदय आणि राज्य समिती सदस्यांचा पत्रकात उल्लेख केला आहे. गेल्यास वर्षभरात महासचिव, चार केंद्रीय समिती सदस्य आणि १७ महत्वाचे नेते ठार झाल्याचेही नक्षल्यांनी कबूल केले आहे. तरीही २०२६ चे लक्ष्य आम्ही खोडून काढू असे आव्हान नक्षलवाद्यांनी सरकारला या पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.