scorecardresearch

महागाई विरोधात राष्ट्रवादीचे भोंगा आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहरतर्फे शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपाजवळ भोंगे लावून बुधवारी महागाई विरोधात आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ भोंगा आंदोलन करण्यात आले.

नागपूर :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहरतर्फे शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपाजवळ भोंगे लावून बुधवारी महागाई विरोधात आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ भोंगा आंदोलन करण्यात आले. या भोंग्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पेट्रोल, डिझेल दराबाबत भाषणाची ध्वनीफिती प्रसारित करण्यात आली.

मोदी यांनी एका भाषणात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले की नाही, असा प्रश्न विचारला होता. ही ध्वनिफीत लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर नाही, असे उत्तर दिले. तसेच भाजप सरकारविरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनात शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, अनिल अहिरकर, प्रवीण कुंटे पाटील, आभा पांडे, प्रशांत पवार, बजरंग परिहार, रमण ठवकर, जानबा मस्के, वर्षां शामकुळे, श्रीकांत शिवणकर, रमेश फुले, शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे, सतीश इटकेलवार, राजेश माटे, राजेश पाटील, प्रवीण पाटील, रिंकू पाली सहभागी झाले होते.

केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल डिझेल घरगुती एलपीजी गॅसचे दर वाढवून  देशात महागाईचा भडका उडवला आहे. २०१४ पासून सत्तेवर आलेल्या मोदीप्रणीत भाजप सरकारने  महागाई कमी करण्याऐवजी वाढवली आहे, सर्वसामान्य नागरिकांना जगणे अवघड झाले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

भाकपचीही निदर्शने

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे गुरुवारी लाल दरवाजा, पिली मारबत चौकात निदर्शने करण्यात आली. भाकपचे जिल्हा सहसचिव अरुण वनकर यांचे यावेळी भाषण झाले. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारला इंधनावरील कर कमी करण्यास सांगत आहे, मात्र ते स्वत: करीत नाही. केंद्राच्या धोरणामुळेच महागाई आकाशाला भिडली असून त्याविरोधात आता जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागेल. या आंदोलनात डॉ. युगल रायलु-, जय राऊत, रवींद्र पराते, शाम निखारे, मारोतराव गवे, जयश्री चहादे, शोभा पराते, भास्कर कोहाड उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp agitation inflation nationalist congress party petrol pump against inflation ysh

ताज्या बातम्या