वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची अनेकवार प्रशंसा करून चुकले आहे. त्यांच्यातील मधुर संबंध राजकीय पंडितांना बुचकळ्यात पण टाकतात. आता पवार शिष्य व राष्ट्रवादी शरद पवारचे खासदार अमर काळे हे चर्चेत आले आहे. ते नुकतेच पंतप्रधान मोदी यांना भेटून आले आहे. या भेटीत त्यांनी मोदी यांना वर्धा भेटीचे निमंत्रण पण देऊन टाकले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी दिलेले उत्तर पण रंजक असेच. त्याची चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांची खासदार काळे यांनी दिल्लीत भेट घेतली. त्यात त्यांनी वर्धेच्या ऐतिहासिक संस्थेबद्दल चर्चा केली. ही संस्था म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था म्हणजेच एमगिरी होय. ही संस्था केंद्राच्या लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. १९५५ मध्ये जमनालाल बजाज केंद्रीय अनुसंधान संस्था स्थापन झाली होती. पुढे दिल्ली आयआयटीच्या माध्यमातून खादी क्षेत्र विकसित करण्यासाठी २००१ साली या संस्थेस व्यापक स्वरूप देण्यात आले व एम गिरी असे नामकरण झाले. महात्मा गांधी यांच्या विचारावर आधारित ग्रामीण उद्योगाचा पाया बळकट करण्याचे ध्येय ठरले. खादीचे उत्पादन व ग्रामीण औद्योगिकरण क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेस बळ देण्याची गरज काळे यांनी पंतप्रधानांनकडे व्यक्त केली. विस्तार करण्यासाठी ३० एकर जागा तसेच संशोधक व अन्य कर्मचारी वर्ग देण्याची मागणी केली. संस्थेचा विकास झाल्यास ती या क्षेत्रात जागतिक पातळीवर नवलौकिकप्राप्त ठरू शकेल असा विश्वास व्यक्त केला. संस्था संचालक डॉ. श्याम मुरकुटे यांच्याशी चर्चा केल्यावर संस्थेची क्षमता लक्षात आली. सेंटर फॉर एक्सेलन्स म्हणून विकास झाला पाहिजे, अशी भावना खासदार काळे यांनी व्यक्त केल्याचे ते म्हणतात.
खासदार काळे यांनी याच भेटीत पंतप्रधान मोदी यांना सदर संस्थेस भेट देण्यास वर्ध्यात येण्याचे निमंत्रण पण दिले आहे. या भूमिकेवर व्यक्त होतांना मोदी यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की या संस्थेच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न केल्या जातील. ग्रामीण अर्थ व्यवस्थेवर आधारित ग्रामीण भागातील लोकांना एव्हढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता ठेवून असणारी ही संस्था आजही टिकून आहे, ही प्रशंसनीय बाब ठरते. एमगिरी संस्थेच्या विकासाची भूमिका राहील. त्यासाठी ठोस असे धोरण तयार केल्या जाईल. संस्था बळकट करू, अशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे खासदार अमर काळे यांनी नमूद केले आहे. ही भेट विकास कामासंदर्भातच होती, असेही काळे यांनी स्पष्ट केले आहे.