नागपूर : महाराष्ट्रातील पाच तरुण संशोधकांना तामिळनाडूतून नव्या विंचवाच्या प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे. संशोधकात अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, स्वप्निल पवार, सत्पाल गंगलमाले आणि विवेक वाघे यांचा समावेश आहे. नव्याने सापडलेली प्रजाती ही ‘हॉरमुरीडी’ कुळातल्या ‘चिरोमॅचेट्स’ या जातीमधील आहे.  ‘चिरोमॅचेट्स’ जात ही भारतीय द्विपल्कासाठी प्रदेशनिष्ठ असून त्यात आतापर्यंत पाच प्रजाती ज्ञात होत्या. आता नव्याने शोध लागलेल्या प्रजातीमुळे ही संख्या सहावर गेली आहे.

पाचमधील तीन प्रजाती या महाराष्ट्र, केरळमध्ये एक आणि आंध्रप्रदेशात एक  होत्या. तमिळनाडूत ‘चिरोमॅचेटस’ या जातीची ही पहिलीच नोंद आहे. ही प्रजाती तिरुनेवेली जिल्ह्यातील अगस्त्यामलाई शिखराजवळ समुद्रसपाटीपासून ९०० ते ११५० मीटर उंचीवर एप्रिल २०२१ मध्ये आढळून आली होती. या प्रजातीच्या नमुन्यांवर साधारण वर्षभर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती अगोदर ज्ञात असलेल्या कुठल्याही प्रजातीपेक्षा वेगळी असल्याचे लक्षात आले आणि नंतर त्यासंबंधीचा संशोधन निबंध सादर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विंचूतज्ज्ञांनी सदर संशोधनाबाबतची पडताळणी केल्यानंतर हा निबंध २२ जूनला अमेरिकेच्या मार्शल विद्यापीठाच्या ‘युस्कॉर्पिअस’ या आतंरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित करण्यात आला. अगस्त्यामलाई शिखराजवळ हा विंचू आढळून आला म्हणून त्याचे नामकरण ‘चिरोमॅचेट्स अगस्त्यामलाएनसीस’ असे करण्यात आले आहे.

कुठे आढळते?

रंग, नांगीच्या विविध भागांच्या लांबी आणि रुंदी यांची गुणोत्तरे, ‘पेक्टीनल टीथ’ची संख्या यासह इतर अनेक वैशिष्टय़ांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती अगस्त्यामलाई डोंगरात सदाहरित प्रकारच्या जंगलातील मोठमोठे दगड आणि खडकांच्या कपारींमध्ये आढळून येते.

पश्चिम घाट जैवविविधतेने संपन्न असून मागील अनेक दशकांपासून संशोधकांची मोठी फळी यावर काम करीत आहे, पण अजूनही अनेक प्रजातींचा शोध लागत असल्यामुळे पश्चिम घाट आणि एकूणच भारतीय पर्यावरणीय संशोधनाची गरज मोठी आहे. – अक्षय खांडेकरसंशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन.