राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळींच्या पिकांचे मोठे नकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी नंतर नव्या वर्षांत येणाऱ्या तुरडाळीचे भाव शंभर रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावाच्या जवळपास डाळींना दर मिळत असल्याने सध्या बाजारात तेजी असली तरी नव्या वर्षांत सर्वच डाळींचे दर गगणाला भिडणार असल्याची शक्यता डाळ बाजारात व्यक्त केली जात आहे.

तूरडाळ हे दैनंदिन धान्यातील महत्त्वाचे कडधान्य आहे. प्रत्येक घरात जेवणात वरण प्रामुख्याने असतेच. सध्या नागपूरच्या डाळ बाजारात समाधानकारक उलाढाल आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही डाळीचे दर अपेक्षेप्रमाणे मिळाताहेत. डाळींचे दर हमीभावाच्या जवळपास असल्याने शेतकरी आणि व्यापारी सुखावलेले आहेत. सणासुदीच्या काळात सर्व प्रकारच्या डाळींची मागणी जोरात आहे. मात्र नुकतेच राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आलेले पीक गेले. राज्यात जवळपास चाळीस टक्के डाळ पिकांचे नुकसान झाले.  त्यामुळे नव्या वर्षांत फेब्रुवारी माहिन्यात येणाऱ्या डाळींचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या शहरात तुरीच्या डाळीचे दर ७५ ते ८५ रुपये  रुपये प्रति किलो आहेत. मात्र पिकांचे नुकसान झाल्याने यंदा आवक मंदावलेली असेल. त्यामुळे इतर राज्यातून शहराच्या बाजारात तूर आणावी लागेल. त्यामुळे नव्या वर्षांत तुरडाळ शंभरी पार करू शकते, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तावली आहे.  सरकारने डाळींच्या निर्यातीवर मर्यादा घातल्या आहेत. या मर्यादा उठवल्यास बाजारात भाव वाढतील. सध्या उडद डाळ ६ हजार ते ९ हजार प्रीत क्विंटल, मसूर ५ हजार दोनशे ते सहा हजार, वटाणा पाच हजार आठशे ते सहा हजार, मूग ६ हजार ते सात हजार, तूर डाळ सात हजार ते आठ हजार, चणाडाळ ५ हजार ते ६ हजार पाचशे रुपये क्विंटल आहे.

सरकारने डाळींच्या निर्यातीवर बंदी घातल्यास येथील शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. पावसामुळे डाळ उत्पादनाला ४० टक्के  फटका बसला आहे. त्यामुळे नव्या डाळींचे भाव महागतील. तूर डाळ शंभरी पार जाऊ शकते.

– प्रकाश मोटवाणी, ठोक डाळ व्यापारी.