scorecardresearch

नवजात बाळ विक्री प्रकरण: भोयरकडे कोट्यवधींची संपत्ती ; फार्महाऊसवर देहव्यापार

नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा सूत्रधार बोगस डॉक्टर विलास भोयर हा रुग्णवाहिकेवर चालक म्हणून १० हजार रुपये वेतनावर काम करीत होता. त्याने रात्रभरातून पाच लाख रुपये खर्च करून डॉक्टरची बनावट पदवी घेतली.

नागपूर : नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा सूत्रधार बोगस डॉक्टर विलास भोयर हा रुग्णवाहिकेवर चालक म्हणून १० हजार रुपये वेतनावर काम करीत होता. त्याने रात्रभरातून पाच लाख रुपये खर्च करून डॉक्टरची बनावट पदवी घेतली. आज त्याच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. त्याने शेकडो नवजात बाळांची विक्री करून तसेच अनेकांना बोगस डॉक्टरची पदवी मिळवून देत कोट्यवधी कमावल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतमजूर कुटुंबात जन्मलेला भोयर पैसे कमविण्यासाठी गैरमार्गाला लागला. तो बारावी नापास असताना स्वतः बोगस डॉक्टर बनला. त्यानंतर त्याने अनेक मित्र-मैत्रिणींना पाच लाखात रात्रभरातून डॉक्टर बनवले. त्यासाठी त्याने अनेकांकडून पैसे उकळल्याची माहिती आहे. चालक असलेल्या भोयरने गुमथळा आणि वाठोड्यात दोन मोठमोठे रुग्णालय बांधले. भोयर याची पत्नी शासकीय रुग्णालयात नोकरीवर आहे. भोयरच्या कृत्यामुळे त्याच्या पत्नीच्याही वैद्यकीय पदवीवर संशय निर्माण झाला आहे. नवजात बाळ विक्री प्रकरणात पत्नीचा सहभाग असल्याची शक्यता असल्यामुळेच ती फरार झाल्याचे बोलले जाते. गुन्हे शाखेच्या रडारवर असलेली धरमपेठमधील स्वच्छता कर्मचारी व नंतर चक्क प्रसूतीतज्ञ बनलेली महिला सध्या बेपत्ता आहे. गुन्हे शाखेचे अति. आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक मनगटे, तपास अधिकारी रेखा संकपाळ यांनी आतापर्यंत चौघांना अटक केली असून अन्य आरोपी रडारवर आहेत.
विविध राज्यातील वारांगणांशी संपर्क
मौदा तालुक्यातील पावडदौनामध्ये भोयर याने कोट्यवधी खर्च करून फार्म हाऊस बांधले. या फार्महाऊसमध्ये तो सेक्स रॅकेट चालवत होता. भोयर याच्या संपर्कात छत्तीसगडसह अन्य राज्यातील वारांगणा होत्या. त्यांच्याकडून तो फार्महाऊसवर देहव्यापार करवून घेत होता. तसेच अविवाहित तरूण-तरूणींसाठी विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत होती, अशी चर्चा आहे.
चार आरोपींना न्यायालयीन कोठडी
या प्रकरणात आतापर्यंत अटकेत असलेले विलास भोयर, वारांगणांचा दलाल राहुल ऊर्फ मोरेश्वर निमजे, नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत, बाळाची आई यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची विनंती गुन्हे शाखेने केली. त्यानुसार न्यायालयाने चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
बाळ विकणाऱ्या आईने मागितला ताबा
केवळ दोन दिवसांच्या बाळाची १० लाखांत विक्री करणाऱ्या युवतीचे बाळावरील प्रेम अचानक उफाळून आले. तिने न्यायालयात वकिलांमार्फत बाळाचा ताबा मिळण्याची विनंती अर्ज केल्याची माहिती आहे. परंतु, तिला बाळ दिल्यास पुन्हा खरेदी-विक्रीचा व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Newborn baby sale case bhoyar owns billions prostitution farmhouse amy

ताज्या बातम्या