नागपूर: करोनामुळे आई आणि वडील दोघेही गमावलेल्या नागपूर जिल्ह्यातील ७९ बालकांना केंद्र व राज्य सरकारचे एकत्रित १५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे दस्तावेज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी (३० मे) वाटप करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री स्मृती इराणी यांनी देशभरातील मुलांशी ऑनलाइन संवाद साधला.

करोना महामारीमुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड ‘ निधीतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. या मुलांना वयाच्या २३ वर्षापर्यंत मासिक विद्यावेतन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आयुष्यमान भारत योजनेतून मुलांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचा प्रीमियम देखील पीएम केअर्स फंडातून भरला जाणार आहे.

हेही वाचा : “ते स्वभावाने फटकळ आहेत पण…”; गडकरींच्या वाढदिवसाच्या दिवशीच संजय राऊतांचं वक्तव्य

२७०० जणांचे एक पालक, तर ७९ मुलांचे दोन्ही पालक करोनामुळे दगावले

एकट्या नागपूर जिल्ह्यात करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १० हजारावर आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये जिल्ह्यातील २७०० मुलांचे आई किंवा वडील यापैकी एक जण दगावले, तर ७९ मुलांचे आई आणि वडील दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. काहींच्या नातेवाईकांनी त्यांना स्वीकारले नाही. अशा मुलांची काळजी शासन घेत आहे.