शहरात ७० हजार कोटींचे काम-गडकरी

नागपूर : गडकरी केवळ घोषणा करतात, काम कुठे झाले असे काही लोक म्हणतात. त्यांना मी सांगू इच्छितो, नागपुरात सुमारे ७० ते ७५ हजार कोटींचे प्रकल्प सुरू आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत लिबर्टी चौक ते विभागीय क्रीडा संकुलार्पयच्या सदर उड्डाण पुलाचे लोकार्पण शुक्रवारी त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी उपस्थित होते. शहरात केवळ पायाभूत सुविधाच नव्हेतर सांस्कृतिक, शैक्षणिक सुविधांद्वारे नागपूरचा विकास साधला जात आहे .

शहरांमध्ये एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत तसेच  सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी यांच्या स्थापनेमुळे शैक्षणिक विकास होत आहे. शैक्षणिक विकासासोबतच सुरेश भट सभागृह, खासदार क्रीडा महोत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव यांच्या माध्यमातून सांस्कृतिक विकास साधला जात आहे. नागपुरात ३५० क्रीडांगणे बांधण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नागपूर मेट्रोच्या कार्याची प्रशंसा जर्मनी व फ्रान्स येथील पथकाने केली आहे. मेट्रोचा पहिला टप्पा नऊ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीने  येत्या ६ महिन्यात पूर्ण होईल. तसेच दुसरा टप्पा  ९ हजार कोटी रुपयाच्या तरतुदीने आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

गडकरी यांनी अनेक प्रकल्प सुरू केले आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागपूर हे देशातील प्रमुख शहर होईल. पश्चिम नागपूर आमदार असतानापासून सदर उड्डाण पुलाची मागणी होती. त्यानंतर माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी ही मागणी लावून धरली. या उड्डाण पुलामुळे सदरची वाहतूककोंडी फुटणार आहे. शिवाय माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वेगाने घरी जाता येईल, असे फडणवीस म्हणाले.

सदर उड्डाण पूल

सदर येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून लिबर्टी चित्रपटगृह ते मनोरुग्णालय (क्रीडा संकुल) असा उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. हा डबल डेकर पूल आहे. नागपूर ते ओबेदुल्लागंज महामार्ग क्रमांक ६९ वर ३.९६ किलोमीटर अंतराचा उड्डाण पूल आहे. या पुलावर २८५ कोटी रुपये खर्च झाले. २९ मार्च २०१७ ला पुलाचे काम सुरू झाले. २४ महिन्यात हे काम होणे अपेक्षित होते. ते ३१ जानेवारी २०२० ला पूर्ण झाले. केसीसी बिल्डकॉन प्रा.लि.ने हे काम केले.