अकोला: महामार्गाची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती व नदी-नाल्यांचे खोलीकरण करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिले. अकोला दौऱ्यात नितीन गडकरी यांनी खासदार, आमदारांच्या निवासस्थानी भेटी देत विकास कार्याची माहिती घेतली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासगी कार्यक्रमानिमित्त अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. पश्चिम विदर्भातील रस्ते प्रकल्पांची त्यांनी हवाई पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व इतर अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून माहिती घेतली व महामार्गाच्या कामांची पाहणी केली. महामार्गावर निकषांनुसार आवश्यक सर्व दुरूस्ती, कामे पूर्ण करावीत. जिल्ह्यात जलसमृद्धीच्या दृष्टीने नदी-नाल्यांचे खोलीकरणही आवश्यक आहे. त्या दृष्टीने या कामांना वेग देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अकोला जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला-महान मार्ग, शेगाव-बाळापुर मार्ग, गांधीग्राम येथे पूल, एमआयडीसी भुयारी मार्ग, तसेच वळण मार्ग आदी प्रस्ताव नितीन गडकरींपुढे मांडले होते. त्या प्रस्तावाला गडकरींनी मान्यता दिली.

खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. संजय कुटे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. वसंत खंडेलवाल यांच्या मागणीची पूर्ती करून तीन हजार कोटींच्या विकास कामांना नितीन गडकरींच्या खात्याने मंजुरी दिली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्याचा देखील आढावा नितीन गडकरींनी घेतला.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी आज खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी राजकीय, सामाजिक विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भाजप प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, महाबीज संचालक डॉ. रणजीत सपकाळ आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन गडकरी यांनी आ. वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी देखील भेट दिली. यावेळी नितीन गडकरींचे स्वागत करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खंडेलवाल यांच्यासोबत गडकरींनी चर्चा केली. विकासाच्या काही प्रकल्पांवरही त्यांनी मत जाणून घेतले. यावेळी गौरव खंडेलवाल, सागर खंडेलवाल आदी उपस्थित होते. अकोला दौरा आटोपल्यानंतर नितीन गडकरी शिवणी विमानतळावरून रवाना झाले.