नागपूर: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर, या दोन विषयांवरून फार मोठा गदारोळ उडाला होता. विरोधकांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन तास भाषण देत विरोधकांना प्रतिउत्तर दिले. मात्र यानंतरही विरोधकांकडून ऑपरेशन सिंदूर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे विधान केलेले आहे. युद्धाचे तंत्रज्ञान आज कशाप्रकारे बदलले असून ऑपरेशन सिंदूरने आपल्याला काय शिकवले या संदर्भात गडकरींनी सांगितले.

नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्र जागृती प्रतिष्ठानने वंदे मातरम राष्ट्रगानला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केले. याबद्दल राष्ट्र जागृती प्रतिष्ठानला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आपल्या देशाला विश्वगुरू बनायचं आहे. आपल्या देशाची सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती आणि विकास करून जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र बनवायचे आहे. आपल्या संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यातून एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली की, आता युद्धाचे नॉर्म्स बदललेले आहे. आता रणगाडे, ट्रकमध्ये बसून सैनिक सीमेवर जातील, गोळीबार करतील, हात बॉम्ब फेकतील असे युद्ध राहिले नाही. आता युद्ध टेक्नॉलॉजीने प्रभावित झाले आहे. ते मिसाईल्स आणि ड्रोन युद्ध आहे आणि आज जगामध्ये ज्याच्याकडे सगळ्यात जास्त चांगली टेक्नॉलॉजी आहे तोच विश्वगुरू बनू शकतो अशी स्थिती आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की या ऑपरेशनमध्ये मिसाईल आणि ड्रोन याचा उपयोग झाला ते ड्रोन आपल्या नागपुरातल्या एका उद्योगपतींनी तयार केले याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे.

येणाऱ्या काळात आपल्याला ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोवेशन रिसर्च, सायन्स टेक्नॉलॉजी या सगळ्या क्षेत्रात प्रगती करायची आहे. ही प्रगती ज्यांना करायची आहे ते भविष्यातले नागरिक आणि आजचे विद्यार्थी सगळे आपल्यासमोर बसलेले आहेत. त्यांच्या संशोधनातून, त्यांच्या अध्ययनातून भविष्यातला भारत निर्माण होणार आहे. आज टेक्नॉलॉजी सगळे क्षेत्र बदलत आहे. जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपल्या देशाची झाली पाहिजे. हा देश विश्वगुरू झाला पाहिजे, फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनोमी झाली पाहिजे आणि हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आणि ते पूर्ण करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर माझ्यासमोर बसलेल्या सर्व नागरिकांमध्ये आणि या छोट्या विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये आहे. आपण सगळ्यांनी मिळून संकल्प केला तर आपण नक्कीच हे स्वप्न पूर्ण करू शकतो. वंदे मातरम हा आपला संस्कार आहे. आपला देशभक्तीचा मंत्र आहे आणि आज १५० वर्षे त्याला झाले, त्याबद्दल आपण या ठिकाणी कार्यक्रम करतोय याचा मला आनंद आहे, असेही गडकरी म्हणाले.