नागपूर : सर्वसामान्य विमान प्रवाशांना १४ दिवसांच्या गृहविलगीकरणात पाठवले जाते,  मात्र स्थानिक प्रशासन मंत्री आणि इतर उच्चपदस्थ मंडळींना वेगळा नियम लावत असल्याने टाळेबंदीतही ते राज्यभर दौरे करीत आहेत. सामान्य विमान प्रवासी व मंत्र्यांना गृहविलगीकरणासाठीचे वेगवेगळे नियम का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

२५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. केंद्राच्या नियमावलीसोबतच राज्य सरकारने विमान प्रवासासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार विमान प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाते. तसेच प्रवाशाच्या डाव्या हातावर शिक्का मारला जातो. शिवाय, त्यांना १४ दिवसांसाठी गृहविलगीकरणात राहावे लागते. मात्र, राज्यातील मंत्री, विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष यांना विमान प्रवासानंतरही गृहविलगीकरणातून सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ही मंडळी टाळेबंदीतही  दौरे करीत आहेत. वास्तविक यासाठी स्थानिक प्रशासनाला दिलेल्या अधिकाराचा लाभ घेण्यात येत आहे. मार्गदर्शक सूचनेनुसार प्रवासी कार्यालयीन किंवा तातडीच्या कामासाठी प्रवास करत असल्यास स्थानिक प्रशासन गृहविलगीकरणातून सवलत देऊ  शकते. तसेच एखादा प्रवासी महाराष्ट्रात आला आणि आठवडय़ात परत गेला तर त्याला गृहविलगीकरणात पाठवण्याची आवश्यकता नाही, अशी सूचना आहे. यामुळे करोनाच्या संसर्गाची भीती दाखवून सर्वसामान्य प्रवाशाच्या डाव्या हातावर १४ दिवसांच्या गृहविलगीकरणाचा शिक्का मारला जातो. तर मंत्री, विरोधी पक्ष आणि इतर पदस्थ मंडळींना यातून सूट दिली जात आहे. सर्वसामान्य प्रवासी आणि मंत्र्यांना विमान प्रवासात वेगळा न्याय काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी २७ मे रोजी नागपूर आणि विदर्भाचा दौरा केला. शिवाय त्यांनी  जिल्हा आढावा बैठका आणि पत्रपरिषदाही घेतल्या. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विशेष विमानाने मुंबईचा दौरा केला. तसेच बहुजन कल्याण व मदत, पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईचा प्रवास केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टाळेबंदीत अनेकदा विमान प्रवास केला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मंबई ते  दिल्ली आणि नागपूर असा प्रवास केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबई ते नागपूर प्रवास करतात. मात्र, त्यांना गृहविलगीकरणात जावे लागले नाही.

यासंदर्भात ऊर्जामंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने टाळेबंदीच्या काळात विमान प्रवासासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून प्रवास शासकीय कामासाठी केला, तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांनी केंद्र आणि राज्य सरकारने काढलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मंत्री महोदयांनी प्रवास केल्याचे सांगितले.

मंत्री असो किंवा सर्वसामान्य प्रवासी एक-दोन दिवसांसाठी एखाद्या शहरात जात असेल आणि परत येत असेल तर त्यांना गृहविलगीकरण शिक्का मारला जात नाही. परंतु त्यासाठी त्यांना परतीचे तिकीट सादर करणे आवश्यक आहे.

– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका