नागपूर : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रकरणात सिंधुदुर्ग पोलिसांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावण्याची कृती कायदेशीरच असल्याचा निर्वाळा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिला. पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम १६० अन्वये नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. ६५ वर्षांवरील व्यक्तीला नोटीस बजावून चौकशीसाठी ठाण्यात बोलावणे बेकायदेशीर असल्याने पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. गुरुवारी एका दौऱ्यानिमित्त वळसे पाटील नागपूरला आले असता विमानतळावर पत्रकारांनी फडणवीस यांच्या टीकेकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, पोलीस ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करतात त्यावेळी त्यासंदर्भातील कायदेशीर बाबी तपासूनच ते करतात. ज्यांची त्यांना परवानगी नसते त्या गोष्टी ते करत नाहीत. त्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग पोलिसांनी राणे यांना नोटीस बजावली असावी. यात राणे यांनी ठाण्यात जाऊन जबाब देणे किंवा त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवणे यापैकी काय शक्य आहे, याबाबत चर्चा असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कालिचरणला महाराष्ट्र पोलीसही ताब्यात घेणार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा कालिचरण बाबा याच्यावर खरे तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याला महाराष्ट्र पोलीस ताब्यात घेणार असल्याचे सांगितले.