चंद्रपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या सीमा मेश्राम (२९) या परिचारिकेचा रात्रपाळीतील डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी मृत्यू झाला. या घटनेने  जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये रोष  आहे.  परिचारिका संघटनांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा मेश्राम  ही  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात परिचारिका होती.

हेही वाचा >>> भाजपाचं ‘दुकान’ जोरात, पण नवीन ग्राहकच जास्त! स्वपक्षाच्या सद्यस्थितीवर नितीन गडकरींचा मार्मिक टोला

१६ ऑगस्ट रोजी प्रसूती वॉर्डमध्ये रात्रपाळीत ती कामावर होती. या दरम्यान तिला भोवळ आली. तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र त्यावेळी तेथे  एकही डॉक्टर कर्तव्यावर नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंतही सीमाला उपचार मिळाला नाही. प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी खासगी डॉक्टरांकडे नेले. नंतर शुक्रवारी तातडीने नागपूरला नेले. परंतु,वाटेतच तिला मृत्यूने गाठले. रुग्णालयातच नोकरीला असतानाही वेळेवर उपचार न मिळाल्याने परिचारिकेचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. ही चिंतेची बाब असून, रात्रपाळीत वैद्यकीय अधिकारी का उपलब्ध नव्हते, तज्ञ्ज डॉक्टर कुठे गेले होते, रात्रभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या परिचारिकेची  तपासणी का झाली नाही, या घटनेची आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.