काही देशविघातक शक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ विचाराला विरोध करीत आहेत. मात्र, संघाला विरोध करणे म्हणजे भारताला आणि हिंदू संस्कृतीला विरोध करणे आहे. त्यामुळे अशा विरोध करणाऱ्यांनी संघ समजून घेण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.

विद्या विकास पब्लिशर्सच्यावतीने सरसंघचालक यांनी विजयादशमी उत्सवाच्यावेळी केलेल्या भाषणांचा मराठी अनुवाद ‘विजयादशमी’ पुस्तकाचे प्रकाशन सुनील आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. लेखिका व निवेदिका शुभदा फडणवीस यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. विवेकानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महानगर सह संघचालक श्रीधर गाडगे, शुभदा फडणवीस, प्रकाशक नीलेश देशपांडे उपस्थित होते. यावेळी आंबेकर म्हणाले, गेल्या काही वर्षात संघ चर्चेत असल्यामुळे काही समाजविघातक शक्ती संघाला विरोध करत असतात. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध म्हणजे हिंदुत्त्वाचा, भारतीयत्वाचा, राष्ट्रीयत्त्वाचा विरोध आहे, ही भावना आता जनसामान्यांमध्ये वृद्धिंगत होत आहे.

सर्वसामान्य लोक वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या विचारकांच्या तोंडून माहिती ऐकत असून त्यातून संघाविषयी सकारात्मक असो वा नकारात्मक एक दृष्टिकोन तयार होत आहे. एकंदर संघाच्या कार्याबद्दल उत्सुकता वाढत असल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने प्रत्येकाला संघाच्या कार्यकर्त्यांकडूनच संघ समजून घ्यायची इच्छा निर्माण झाली आहे. भारताचा विरोध करणारेच संघाची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करत असल्याचे आता जनसामान्यांना समजले आहे. जे विरोध करतात ते सुद्धा संघाला विरोध का करत आहे ते समजून घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने समाजात स्वयंसेवक वेगवेगळ्या सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत आहेत, असेही आंबेकर म्हणाले. सरसंघचालकांंच्या भाषणाचा दस्तऐवज हा ऐतिहासिक असून तो संग्रही ठेवण्यासारखा आहे.

विजयादशमीला होणाऱ्या सरसंघचालकांच्या भाषणाचा परिणाम म्हणून दरवर्षी सव्वा लाख लोक संघाचे ऑनलाईन सदस्य होत असल्याचेही आंबेकर यांनी यावेळी सांगितले. श्रीधर गाडगे यांनी पुस्तकावर भाष्य केले. शुभदा फडणवीस यांनी पुस्तकामागची भूमिका विषद केली. संचलन सुषमा देशपांडे-मुलमुले यांनी केले. आभार शुभदा फडणवीस यांनी मानले.