युवक काँग्रेसचा विरोध, आंदोलनाचा इशारा
नागपूर : सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या ज्या राष्ट्रसंतांच्या नावाने नागपूर विद्यापीठ ओळखले जाते, त्या विद्यापीठातील मानव्यशास्त्र विभागाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंचाचे संस्थापक व संघ विचारांचे पाईक दिवं. दत्तोपंत ठेंगडी याचे नाव देण्यात येणार असल्याने शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. युवक काँग्रेसने यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना निवेदन सादर करीत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
विद्यापीठामध्ये अलीकडे संघ परिवारातील व्यक्तींच्या नेमणुका व एका विशिष्ट विचारधारेचे कार्यक्रमांना पोषक वातावरण असल्याचा आरोप होत असतानाच आता दिवं. दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव देण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. नुकतेच व्यवस्थापन परिषदेत अधिष्ठाता डॉ. निर्मलकुमार सिंग यांनी दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विद्यापीठ परिसरातील मानव्यशास्त्र विभागाला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सादर केला. याला जवळपास सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला.
या निर्णयावर प्रदेश युवक काँग्रेसने विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र, यापैकी एकालाही स्व. दत्तोपंत ठेंगडी माहितीच नसल्याचा दावा युवक काँग्रेसने केला आहे. त्यामुळे त्यांचे नाव एखाद्या विभागाला देणे संयुक्तिक आहे काय? असा सवाल कुलगुरूंना करण्यात आला. यावर कुलगुरूंनी माहिती गुगलवर शोधण्याचा सल्ला प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजित सिंग यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावर आक्षेप नोंदवत, तीव्र आंदोलनाचा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. आता यावरून ९ मार्चला होणाऱ्या सिनेट बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. यावेळी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष धीरज पांडे, प्रदेश सचिव प्रणीत जांभुळे, आसिफ शेख, एनएसयूआय प्रदेश सचिव नागेश गिन्हें, प्रतीक कोल्हे, सतीश पाली, प्रणय सिंह ठाकूर, नीलेश खोबरागडे, चेतन तरारे, राकेश ईखार उपस्थित होते.
विरोध का?
दत्तोपंत ठेंगडी यांचे कामगार चळवळीचे योगदान सर्वमान्य असले तरी शिक्षण क्षेत्रातील संस्थांना त्यांचे नाव देण्याचे औचित्य काय, असा सवाल केला जात आहे. १९४२ पासून दत्तोपंत ठेंगडींनी स्वत:ला संघकार्यात वाहून घेतले होते. त्यामुळे एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तीचे नाव विद्यापीठातील विभागाला का? असा सवाल केला जात आहे.