वाढत्या करोना संसर्गामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर :  पोलीस दलात करोनाचा संसर्ग मोठय़ा झपाटय़ाने वाढत आहे. करोनामुळे दहा पोलिसांचा मृत्यूही झाला असून प्रत्येक पोलीस ठाण्यात दहा ते वीस पोलीस करोनाने प्रभावित आहेत. या परिस्थितीत पोलिसांमध्ये दहशत पसरली असून प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याची खदखद कर्मचाऱ्यांमध्ये आहे. दुसरीकडे एमआयडीसी पोलिसांनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांसाठी ठाण्यातील दर्शनी भागात ऑक्सिजन मीटर लावले असून हात निर्जंतुकीकरण करून त्यात स्वत:मधील ऑक्सिजनची पातळी मोजता येणार आहे. यामुळे एमआयडीसी पोलिसांचा आदर्श इतर ठाणेदार घेतील का, असा सवाल उपस्थित करण्यात येत  आहे.

शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास ९०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. दहा पोलिसांचा मृत्यूही झाला असून प्रत्येक पोलीस ठाण्यात अनेक करोनाग्रस्त आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याचे नियमित काम करण्यास मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत असून ठाणेदारांसमोर नियमित काम करवून घेण्याचे मोठे आव्हान आहे. दुसरीकडे पोलिसांची प्रकृती खालावत असून अनेकजण सुटी मागतात. कामावर असताना एकदम प्रकृती खालावून रुग्णालयात दाखल होण्याऐवजी दररोज आपली ऑक्सिजन पातळी तपासल्यास वेळेपूर्वीच योग्य उपचार करता येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी आपल्या पोलीस ठाण्यात ऑक्सिजन मीटर दर्शनी भागात बसवून घेतले. या ठिकाणी एक सॅनिटायझरची मशीन लावण्यात आली असून ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी हात निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय  ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी मशीन हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. इतर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्येही करोनाची प्रचंड भीती आहे. शिवाय इतर पोलीस ठाण्यांमध्ये अशा सुविधा नसल्याची बाब लोकसत्ताच्या पाहणीत उघडकीस आली.

प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑक्सिमीटर 

शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत सर्व पोलीस कर्मचारी व अधिकार्यांना ऑक्सिमीटर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता ८ हजार ऑक्सिमीटरची खरेदी करण्यात येत आहे. त्याशिवाय वाफ घेण्यासाठी आवश्यक नेब्युलायझरही देण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांमध्येही ही उपकरणे लावण्यात येणार आहेत. 

– गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त, मुख्यालय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oxygen meters installed for staff at midc police station zws
First published on: 09-09-2020 at 00:05 IST