नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरीत ‘सोशल क्लब’च्या नावावर चक्क जुगार अड्डे सुरु आहेत. या जुगार अड्ड्यांवरील गर्दीमुळे गावकरी त्रस्त आहेत. दररोज लाखोंमध्ये उलाढाल होत असलेल्या या जुगार अड्ड्यांना नेमका आशीर्वाद कुणाचा? असा प्रश्न गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.

यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा तालुक्यात असलेल्या पाटणबोरीत गेल्या अनेक दिवसांपासून ‘सोशल क्लब’,’रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्डे सुरु आहेत. एक जुगार अड्डा तर थेट एका राजकीय नेत्याच्या घरात सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ‘सोशल क्लब’च्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानंतर मंत्रालयातून मंजुरी घ्यावी लागते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ‘सोशल क्लब’ला मंत्रालयातून परवानगी देणे बंद केले आहे. तरीही एका तथाकथित नेत्याने घरात ‘सोशल क्लब’च्या नावाने जुगार अड्डा सुरु केला आहे. ‘सोशल क्लब’च्या नावावर जुगार अड्डे सुरु झाल्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणा राज्याने ‘सोशल क्लब’वर बंदी घातली. या राज्यात आता ‘सोशल क्लब’च्या माध्यमातून जुगार अड्डे बंद झाले. त्यामुळे या राज्यातील मोठमोठे व्यावसायिक जुगार खेळण्यासाठी राज्याच्या सिमेलगत असलेल्या गावाचा आधार घेत आहेत. त्यामुळेच जुगार अड्ड्याच्या यादीत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर-हैदराबाद मार्गावर पाटणबोरी या गावाला ओळख मिळाली.

तेलंगणा आणि कर्नाटक राज्यासह आंध्रप्रदेश, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातील काही व्यापाऱ्यांनी पाटणबोरीत बस्तान मांडले आहे. रोज लाखो रुपयांची उलाढाल पाटणबोरीतून होत असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. सलग चोवीस तास पाटणबोरीत जुगार अड्डे सुरु असतात. पूर्वी येथे २७ पत्त्यांची रमी चालायची तर आता ३१-३३ पत्त्यांची रमी खेळल्या जात आहे. गावातील अनेक तरुणांचेही पाय या जुगार अड्ड्यांकडे वळत आहे. त्यामुळे पाटणबोरीतील कायदा व सुव्यवस्थेसह सामाजिक वातावरणही दूषित झाल्याचे बोलले जाते. मात्र, या जुगार अड्ड्यांकडे पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही ‘अर्थपूर्ण’ दूर्लक्ष असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

रंगबेरंगी ‘टोकण सिस्टीम’वर चालतो जुगार

पाटणबोरीतील जुगार अड्डा संचालकांनी पैशांऐवजी रंगबेरंगी ‘टोकण सिस्टीम’वर जुगार खेळवणे सुरु केले आहे. जुगार खेळणाऱ्यांकडून १० ते १५ लाख रुपये जमा करुन घेण्यात येतात. त्या बदल्यात १ हजार, ५ हजार आणि १० हजार अशी किंमत असलेले रंगबेरंगी टोकण देण्यात येतात. खेळ संपल्यानंतर जिंकलेल्या टोकणवर तेवढी रक्कम जुगार अड्डा संचालक देतो. हरलेल्या जुगाऱ्याची रक्कम कपात करतो. त्यामुळे डावात पैसे न टाकता लाखोंचा जुगार पाटणबोरीत खेळल्या जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाटणबोरीत पोलिसांची नियमित गस्त असते. अवैध धंदे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. सोशल क्लबची परवानगी घेऊन जर जुगार अड्डा सुरु करण्यात आला असेल तर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल. – रामेश्वर वैंजणे (उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा)