अकोला : राग, अहंकार यापुढे माणुसकी संपत चालली आहे. इतरांच्या दुःख, वेदना याची जाणीव देखील अनेकांना राहिली नाही. अशाच एका संतापजनक घटनेचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात आला. अकोटवरून गंभीर आजारी रुग्णाला उपचारासाठी अकोला येथे घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेची चोहोट्टा बाजार येथे कुत्र्याला धडक लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या कुत्र्याच्या मालकाने रुग्णवाहिकेचा पाठलाग करून समोर रस्ता अडवला. रुग्णवाहिकेच्या चालकाला मारहाण करीत आगोदर अपघातात जखमी कुत्र्यावर उपचार करण्यासाठी त्याला अकोल्याला नेण्याची भूमिका घेतली.
प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. या सर्व प्रकारात दिरंगाई झाल्यामुळे उपचाराअभावी ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णवाहिकेतील निष्पाप रुग्णाचा जीव गेला. या प्रकरणी दहिहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शंकर लिलू मिरतकर याला अटक केली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
अकोट नगरपालिकेच्या कामावर जखमी झालेल्या एका रुग्णाला ऑक्सिजन लावून तातडीने रुग्णवाहिकेतून अकोल्याला हलविण्यात येत होते. चोहोट्टा बाजार येथे रुग्णवाहिकेचा धक्का एका कुत्र्याला लागला. त्यामध्ये कुत्रा जखमी झाला. रुग्णवाहिका पुढे निघून गेली. त्यामुळे संतप्त झालेला कुत्र्याचा मालक शंकर लिलु मिरतकर याने सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रुग्णवाहिकेचा पाठलाग केला. पुढे जाऊन रुग्णवाहिका अडवली.
रुग्णवाहिकेचा चालक सुखदेव मालठाणकर यांना दमदाटी करून मारहाण केली. आधी कुत्र्याला अकोल्याला उपचारासाठी घेऊन चलण्याची मागणी आरोपीने केली. या प्रकारानंतर रुग्णवाहिका चालकाने चोहोट्टा बाजार पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. हा सर्व प्रकार सुमारे अर्धा तास सुरू होता. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णवाहिकेतील रुग्णाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रुग्णवाहिका परत अकोट येथे पाठवण्यात आली. मृतदेहावर अकोट ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी दहिहांडा पोलीस पुढील तपास करीत आहे.
या घटनेमुळे परिसरात शोककाळा पसरली असून आरोपीविषयी संताप व्यक्त केला जात आहे. जखमी कुत्र्याच्या नावावर आततायीपणे रुग्णवाहिका अडवून चालकाला मारहाण केली नसती तर त्या रुग्णाचे प्राण वाचू शकले असते, अशी भावना जनमानसातून व्यक्त झाली.