आत्महत्या प्रकरणी ना तक्रार, ना गुन्हा!

नागपूर : चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात कर्जबाजारी झालेले नागपुरातील औषध व्यापारी विनोद रामानी यांनी आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईट नोट मिळाले नाही किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारही केली नाही. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अजयकुमार मालवीय यांनी दिली.

विनोद चिमनदारस रामानी (४४) रा. किर्ती अपार्टमेंट निकालास मंदिर, तहसील यांनी २०१६ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर आधारित कथानक वापरून  ‘कॉफी विथ डी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले होते. या चित्रपटात विनोदी अभिनेता सुनील ग्रोवर आणि दीपानित्ता शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. २०१७ मध्ये हा चित्रपट बनून तयार झाला. मात्र, दाऊ द इब्राहिमची खिल्ली उडवल्यामुळे छोटा शकील याने रामानी यांना फोनवरून धमकी दिली होती. त्यामुळे घाबरून रामानी आणि विनोद मिश्रा यांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटात विनोद यांनी चार ते पाच मित्रांच्या मदतीने कोटय़वधी रुपये चित्रपटाच्या निर्मितीवर खर्च केले होते. कर्ज फेडताना त्यांची बरीच दमछाक झाली. अखेर त्यांनी घरात गळफास घेतला.