तुकडोजी महाराज अध्यासनातील प्रकार; पदव्युत्तर अभ्यासक्रमाला ‘यूजीसी’ची मान्यता नाही

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील तुकडोजी महाराज अध्यासन हे विद्यावेतनानंतर आता नवीन विषयामुळे चर्चेत आले आहे. विद्यापीठाकडून तुकडोजी महाराज अध्यासन पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याने विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेऊनही आचार्य पदवी घेता येत नाही.

विद्यापीठाच्या २००५ मध्ये झालेल्या नामकरणानंतर राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासनाला चालना मिळाली. तत्कालीन कुलगुरू डॉ. सपकाळ यांनी आणि नंतरच्या काळात डॉ. काणे यांनी यासाठी प्रयत्न केले. शिवाय डॉ. सुभाष सावरकर, डॉ. अक्षयकुमार काळे, ज्ञानेश्वर रक्षक यांच्या परिश्रमातून अभ्यासक्रमही तयार झाला.

राष्ट्रसंतांच्या विचारांची समाजाला आवश्यकता आहे. तरुणांनी त्यांचे विचार आत्मसात करावे, या उद्देशाने या अध्यासनाचा विस्तार करण्यात आला. पदव्युत्तर नंतर विद्यावेतन देऊन पदविका अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला.

यासाठी प्रवेशित २० विद्याार्थ्यांना प्रवेशासह पाच हजार रुपये मासिक विद्यावेतन देण्याचा निर्णय झाला. मात्र, अनेक महिने विद्यावेतनच मिळत नसल्याने अध्यासन चांगलेच चर्चेत होते.

विद्यापीठामध्ये महात्मा गांधी विचारधारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा असे दोन्ही विभाग कार्यरत आहेत. त्यांना यूजीसीची मान्यता असल्याने तेथील विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी आहेत. मात्र, अनेकदा निवेदने देऊनही तुकडोजी महाराज अध्यसनाला यूजीसीची मान्यत मिळवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून आवश्यक ते प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासमंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर रक्षक यांनी केला आहे. यासंदर्भात श्रीगुरुदेव युवा मंचाने अनेकदा लेखी निवेदने देऊन कुलगुरूंशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा एम.ए. अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता मिळवण्यासाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी तातडीने प्रयत्न करावे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर आचार्य पदवीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीचे होईल.

– ज्ञानेश्वर रक्षक, सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासमंडळ.